नागपूर : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा कुणी प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण तयारीत आहोत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी कृती कुणी करू नये. अशी कृती कुणी केल्यास मग ती संघटना असो वा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई होइलच, असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठकी घ्यावी, अशा सूचना पोलीस महासंचालक यांना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कुठलाही निर्णय घेताना त्याची परिणामकता तपासून घ्यावी. या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ, असे गृहमंत्री म्हणाले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिलीय. या मुदतीनंतर राज्यात दंगली होतील का असे गृहमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रात दंगली होतील असे काही वातावरण नाही. मात्र पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


देशात काही राज्यात दंगे झाले आहेत. महाराष्ट्रातही तसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. पण, महाराष्ट्रात पोलीस तयारीत आहेत. जे कुणी असा प्रयत्न करत असतील त्यांना जशास तसे उत्तर देऊ. देशासमोर महागाई, सीमा सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अशी अशांतता काही घटक निर्माण करत आहेत. हे घटक कोण आहे ते पोलीस तपासात समोर येईल, असे त्यांनी सांगितले.


अमरावतीमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. याचा अर्थ असे घटक येथे जास्त ऍक्टिव्ह आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. राज्यात कुठेही वातावरण तापविण्याचा प्रयत्न कुणी केल्यास त्याचा यॊग्य बंदोबस्त केला जाईल असं गृहमंत्री म्हणाले.