लॉकडाऊनचा गैरफायदा घेणाऱ्यांना गृहमंत्र्यांची तंबी
लॉकडाऊन फायदा घेणाऱ्या समाजकंटकांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तंबी दिली
मुंबई : कोरोनाचे गांभीर्य पाहता लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. संपूर्ण पोलीस आणि आरोग्य व्यवस्था कोरोनासाठी दिवसरात्र एक करत आहे. याचा फायदा घेणाऱ्या समाजकंटकांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तंबी दिली आहे. महिला सुरक्षेचा मुद्यावर गृहमंत्री देशमुख यांनी भाष्य केले.
लॉकडाऊनमुळे कुणी गैरफायदा घेऊन महिलांवर अत्याचार करत असेल तर त्यांच्या विरुद्ध अतिशय कठोर कारवाईचे निर्देश पोलीसांना देण्यात आले आहेत. आपल्या राज्यात महिलांना सुरक्षित वाटलंच पाहिजे असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
जनतेने लॉकडाऊन गांभीर्याने घ्यावा म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभरात ठिकठिकाणी रूटमार्च काढला आणि नागरिकांना लॉकडाऊनचे महत्व पटवून दिले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबुन प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊनचा कार्यकाळ वाढवावा लागला. अशा कठीण परिस्थितीमध्ये कष्टकरी, स्थलांतरित मजुरांनी गावाकडे परतण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी आहे तेथेच रहावे. शासनाच्या वतीने सर्वांची राहण्याची सोय, पुरेसे अन्न देण्याची हमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.