महाराष्ट्रात पुन्हा `सैराट`! लव्ह मॅरेजला विरोध करत आई-वडिलांनीच केली लेकीची हत्या
Maharashtra Crime News: महाराष्ट्रात ऑनल किलिंगची घटना घडली आहे. परभणीत जन्मदात्या आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केली आहे.
Maharashtra Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना परभणीत घडली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा आवळून खून केली आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा येथे 21 एप्रिल रोजी ही घटना घडली आहे. या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतर हत्येचे प्रकरण उजेडात आलं आहे. संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या घटनेने समाजमन सून्न झाले आहे.
इतर जातीच्या मुलाबरोबर विवाह का करतेस? म्हणून परभणीत १९ वर्षीय मुलीचा जन्मदात्यानेच खून केला आहे. २१ एप्रिल रोजी ही घटना घडल्याचे सांगितले जातेय. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागू न देता भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मयत मुलीचे प्रेत रात्री जाळून पुरावा नष्ट करण्यात आला आहे. मुलीच्या अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या लोकांनाही घटनेची माहिती होती. पण याबाबत कोणीही पोलिसांना कल्पना दिली नाही. पोलिसांना या घटनेची गुप्त माहिती मिळताच मयत मुलीच्या आई- वडिलांसह ८ जणांविरुद्ध पालम पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय तरुणीचे गावातीलच अन्य जातीतील मुलावर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुलीनी इतर जातीतील मुलासोबत लग्न करु नये, म्हणून तिच्यावर आई-वडिल दबाव टाकत होते. मात्र तरीही तिने त्याच मुलासोबत लग्न करण्याचा निर्धार केला होता. म्हणून पालकांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती तिच्या निर्णयावर ठाम होती. 21 एप्रिलच्या रात्री पालकांनीच तिची हत्या करत गपचुप तिचा मृतदेह जाणून टाकला.
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वडील बालासाहेब भीमराव बाबर, आई रुख्मिणीबाई बालासाहेब बाबर, गंगाधर योगाजी बाबर, राजेभाऊ रखमाजी बाबर, अशोक रुस्तुमराव बाबर, आबासाहेब रुस्तुमराव बाबर,अच्युत दत्तराव बाबर,गोपाळ अशोक बाबर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गंगाखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
महाराष्ट्रात ऑनर किलिंगचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नव्हे तर, आई-वडिलांना समजवण्याच्या ऐवजी भावकीतील लोकांनी त्यांच्या या कृत्याला पाठिंबा देत या गुन्ह्यात सहभागी देखील झाले होते. पालम पोलिसांत पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहा जण अशा एकूण आठ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.