प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : देशभरातील अश्वशौकीन ज्या यात्रेची आवर्जून वाट पहात असतात त्या सारंगखेड्याच्या यात्रेला सुरुवात झालीय. त्यात चेतक फेस्टिव्हल नावानं अश्व महोत्सव आता भव्य स्वरुपात आयोजित करण्यात आलाय. राज्य पर्यटन विकास महामंडळाचंही त्याला पाठबळ लाभलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मर्सिडीज गाड्यांची जी क्रेझ आहे त्यापेक्षा जास्त क्रेश सारंगखेड्याच्या अश्व बाजारातील अश्वांची आहे. लाखोंच्या घरात असलेली अश्वांची किंमत,  त्यांचे रुबाब आणि त्यांची निगा राखण्यासाठी तैनात असलेला लवाजमा,  हा सारंगखेड्याच्या अश्व बाजाराची आन बान शान आहे. असा नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याचा अश्व मेळा मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सुरु झाला आहे.  


सांरगखेडा या अश्व बाजाराला ३०० वर्षांचा इतिहास आहे. हा भारताचा सर्वात मोठा अश्व महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये भारतीय वंशाचे अश्व प्रदर्शन, अश्व दौड आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येतात. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी एम टी डी सी ने या चेतक मोहत्सवाला जागतिक पटलावर नेण्याचा प्रत्यन केला आहे. 


राज्यातील कुठल्याही पर्यटन स्थळावर नसतील अश्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांचा उत्सव उत्सव एक महिन्यांचा करण्यात आला आहे.  मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला सारंगखेड्यात श्रीदत्त जयंती निमित्त एकमुखी श्रीदत्ताची यात्रा भरते. याठिकाणी अध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचा आनंद एकत्र घेता येतो. या अनोख्या यात्रोत्सवात  दरवषी तीन ते पाच लाख भाविक श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी येतात. या सर्व भाविकांना श्री दत्त दर्शनासोबत ओढ लागलेली असेते ती येथे भरणाऱ्या जागतिक दर्ज्याच्या घोडे बाजाराची.


देशातील अश्व प्रेमी तर या यात्राचे आतुरतेने वाट पाहतात. देशातीलच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून अश्व प्रेमी या घोड्याच्या बाजाराला भेट देतात आणि घोड्याची खरेदी विक्री करतात


या वर्षी हा घोडे बाजार आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे विशेष शामियाने उभारण्यात आले आहेत. डोळ्याने पारणे फेडणार हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल भेट देतात. 


या घोडे बाजारात पंजाब, हरियाणा, कच्छ , काठियावाड, उत्तर प्रदेश तसेच  राज्यातील मोठे घोडे व्यापारी आणि अश्व शौकीन आपले घोडे येथे आणतात. अनेक अश्व प्रेमी तर घोड्याला लोकांनी दाद द्यावी यासाठी आपले अश्व या यात्रेत आणतात. सुरक्षित वातावरण , उज्वल परंपरा आणि घोडी खरेदीसाठी येणाऱ्या चाहत्याची सख्या येथे मोठी असल्याने अश्व व्यापारीही या यात्रेत हिरहिरीने सहभाग नोंदवतात.