विशाल करोळे, झी माडिया, औरंगाबाद : गणपतीच्या वर्गणीतून अनेक चांगली काम केली गेलेली अनेकांनी पहिली आहेत. मात्र औरंगाबादच्या ब्लू बेल सोसायटीने आगामी गणपती उत्सवाची वर्गणी आधीच जमा करून एक छोटेखानी हॉस्पिटल सोसायटीमध्ये उभारलं आहे. त्याच्या सुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साफ रुम्स,  पाहावी तिथे स्वछता, प्रवेश केल्यावरच समाधान मिळणारी, जागा एक हॉस्पिटल यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. मात्र औरंगाबादमध्ये सिडको भागातील ब्लू बेल कॉलोनीने त्यांच्या कॉलनीमध्ये हे हॉस्पिटल उभारलं आहे. सध्या अनेक कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही,  त्यामुळे सोसायटीने आत्मनिर्भर होत स्वतःच्या कॉलनीमध्ये स्वतःचं हे हॉस्पिटलसारखं आयसोलेशन सेंटर निर्माण केलं आहे. 


हे सेंटर तयार करण्यासाठी  कॉलनीतील रहिवाशांनी पैसे जमा केले. केवळ पैसाच नाही तर कोणी बेड आणला, कोणी अजून काही साहित्य, कोणी डॉक्टरने स्वतः या ठिकाणी रुग्णांना सेवा देण्याची तयारी दर्शवली. आणि यातून एका मोठ्या बंगल्यामध्ये छोटे हॉस्पिटल तयार झालं. 


या ठिकाणी बालकांसाठी वेगळी सोय आहे,  महिलांसाठी वेगळी आणि पुरुषांसाठी वेगळी रूम आहे. म्हणजे कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण या ठिकाणी आल्यावर त्याला कुठे हॉस्पिटलमध्ये आल्यासारखं वाटणार नाही, पण त्यावर उपचारदेखील होतील.


सोसायटीतल्या काही लोकांच्या  मनात  हा विचार आला त्यातून सोसायटीचे लोक जमा झाले, चर्चा झाली आणि तातडीने कामाला सुद्धा सुरुवात झाली. प्रश्न केवळ डॉक्टरचा होता. त्वरित कॉलनीमधील डॉक्टरदेखील तयार झाले. कॉलनीमध्ये कुणी रुग्ण आढळला तर त्याच्यासाठी त्याच्या घरीच या आयसोलेशन सेंटरची उभारणी झाली. 


हॉस्पिटलमध्ये रूम मिळत नाही, बेड  मिळत नाही अशी ओरड सध्या सुरु आहे.  मात्र कोरोनासारख्या या मोठ्या संकटात राज्यातील कॉलनी, सोसायटी यांनी पुढाकार घेऊन जर अशा पद्धतीची सोय केली तर निश्चितपणे सरकारवरचा ताणही कमी होईल आणि कॉलनीतील सभासदांना अगदी त्यांच्या घरच्यासारख्या सोयीसुविधा मिळू शकतील. त्यामुळे इतरांनीही या उपक्रमाबाबत विचार करण्यास नक्कीच हरकत नाही.