गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका गरोदर महिलेची  ऑटो मध्येच प्रसूती झाली आहे. विशेष म्हणेज रुग्णालयाबाहेरच महिलेने बाळाला जन्म दिला आहे. हॉस्पिटलमध्ये निरोप समारंभ सुरु होता. यामुळे या महिलेकडे कुणीही लक्ष दिले नसल्याचा आरोप केला जात आहे. तर, रुग्णलायाने हे आरोप फेटाळले आहेत (Pregnant Women Delivery In Auto Rickshaw). 


नेमका काय आहे प्रकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगोलीच्या वसमत येथील स्त्री रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या रुग्णालयात एका वरिष्ठ अधिकऱ्याचा निरोप समारंभ सुरू होता. त्यामुळे रुग्णालयातील सर्वजण या निरोप समारंभात व्यस्त होते. यावेळी एका महिलेची ऑटो मध्येच प्रसूती झाल्याचा आरोप केला जात आहे. 


अलका विजय मोरे या गरोदर मातेला वसमत येथील स्त्री रुग्णालयात ऑटो मधून आणलं होतं. पण, रुग्णालयातील सर्वजण एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात गुंतले होते. अनेकदा बोलवून ही कुणीच येत नसल्याचा आरोप ऑटो चालकाने केला. यामुळे महिलेने  ऑटोमध्येच बाळाला जन्म दिला.  


रुग्णालयाने आरोप फेटाळले


रुग्णालया प्रशासानाने हे आरोप फेटाळले आहेत. याबाबत स्त्री रुग्णालयाचे अधिकारी डॉ. संदीप काळे यांना विचारणा केली असता रुग्णालयात येण्यापूर्वीच सदर महिलेची प्रसूत झाली होती. ऑटो येताच आमच्या कर्मचाऱ्यांनी बाळाला आणि मातेला रुग्णालयात भरती करून घेतल. मातेची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण बाळाला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला नांदेड येथे रेफर करण्यात आले असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले आहे.


महिलेची रस्त्यातच प्रसुती


नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा च्या डोंगर रांगांमध्ये आरोग्य विभागाचे वाभाळे काढणारी एक धक्कादायक घटना समोर आली होती. सातपुड्याच्या दुर्गम भागातील महिलेला बाळंतपणासाठी बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर गरोदर महिलेला बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात आणणारी रुग्णवाहीकाच रस्त्यातच पंक्चर झाल्यानं महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याचा प्रकार घडला होता.