पुणे : शंभर देशांना आपल्या वेटीस धरलेल्या कोरोना व्हायरसने अखेर महाराष्ट्रात प्रवेश घेतला आहे. महाराष्ट्रातील पुण्यात दाम्पत्याला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या दोनही जणांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच पुण्यातील नायडू रूग्णालयात यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दोघांना नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


कोरोनाची लागण झालेल्या या दोघांचा नेमका प्रवास कसा होता? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्याची ओळख सांगण्यास राज्य सरकारकडून मनाई करण्यास आली आहे. 


या दोघांना पुण्यातील नायडू रूग्णालयात स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे. 


या कोरोनाग्रस्तांसह मुंबई-पुण्यातील असे मिळून 40 जण दुबई प्रवासाकरता गेले होते. 


20 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी असा दुबईचा कालावधी होता. 


एका खासगी ट्रॅव्हल कंपनीकडून या चाळीस जणांनी आपली टूर अरेंज केली होती. 


पुणे-मुंबई एअरपोर्ट-दुबई-मुंबई एअरपोर्ट-पुणे असा या कोरोनाग्रस्तांचा प्रवास झाला होता. 


1 मार्च रोजी पुण्यात परतल्यावर त्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आली. त्यानंतर सोमवारी 9 मार्च रोजी दुपारी स्वतःहून नायडू रूग्णालयात दाखल झाले. 


 या दोघांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. 


त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यात या दोघांना करोना या विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले.


त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेतली जात आहे. 


यामध्ये त्यांनी दुबईहून कोणत्या विमानाने प्रवास केला. तसेच कोणत्या टॅक्सीने मुंबई एअरपोर्ट ते पुणे प्रवास केला याची देखील चौकशी केली जाणार आहे. 


तसेच 1 मार्च ते 6 मार्च या सहा दिवसांच्या कालावधीत त्यांचा कुणाकुणाशी संपर्क आला याची कसून चौकशी केली जात आहे. 


पुण्यातील या कोरोनाग्रस्तांसह दुबईत मुंबईतीलही काही नागरिक होते. यामुळे मुंबईला कोरोनाचा धोका आहे का? अशी भीती देखील आता व्यक्त केली जात आहे.