Dharmveer Anand Dighe: धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) हे नाव तसं महाराष्ट्राला परिचित आहे. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या नावाचा वारंवार उल्लेख होत आहे. बंड पुकारल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आनंद दिघे यांच्याही नावाचा उल्लेख करत आहेत. पण यानिमित्ताने अनेक जुने मुद्देही उरकून काढले जात आहेत. नुकतंच संजय शिरसाट यांनी आनंद दिघे यांच्या निधनाचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबातील एकही माणूस हजर का नव्हता? अशी विचारणा केली आहे. तसंच ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाही, ते बदला घेतील असं म्हणत उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाण साधला आहे. यामुळे पुन्हा एकदा आनंद दिघे यांचा मृत्यू नेमका कसा झाला होता याची चर्चा सुरु झाली आहे. 


संजय शिरसाट काय म्हणाले आहेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"खऱ्या अर्थाने गद्दारी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. काल भाषणात अनेकांनी दिघे यांचे नाव घेतले. माझा प्रश्न आहे त्यांना, जेव्हा दिघे साहेब गेले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला ठाकरे कुटुंबातील एकही माणूस हजर का नव्हता ते सांगा. त्यांच्या अंत्ययात्रेला जायला वेळ नव्हता का? काय कारण होतं? त्यांना माहिती होतं की, अंत्ययात्रेला गेलो तर लोक दगडाने मारतील.  म्हणून आम्हाला शिकवू नका," असं संजय शिरसाट म्हणाले आहेत. 


"ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला आहे, त्यांना ठाणेकर कौल देणार नाहीत. ते बदला घेतील. दिघे साहेबांचं कर्तृत्व यांना पुसता येणार नाहीय दिघे साहेबांचा घातपात झाला हे ठाणेकरांना माहित आहे. माणूस आपल्यापेक्षा मोठा होऊ नये म्हणून हा घातपात केला," असा जाहीर आरोपच संजय शिरसाट यांनी केला आहे. 


याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सूपूत्र निलेश राणे यांनीही आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार होते, असा आरोप केला होता. दरम्यान एकनाथ शिंदे यांनीही आनंद दिघे यांच्या निधनासंबंधी बोलताना योग्य वेळ येईल तेव्हा बोलेन. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल त्यादिवशी या राज्यात आणि देशात मोठा भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही असं विधान केलं होतं. 


आनंद दिघेंचा मृत्यू नेमका कसा झाला?


एकनाथ शिंदे यांनीच आनंद दिघे यांचं निधन कसं झालं याची माहिती दिली होती. त्यांनी सांगितलं होतं की, "गणपतीच्या दिवसांमध्ये त्यांचा 19 ऑगस्टला अपघात झाला. ते पहाटेपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांकडे फिरत असत. त्याचवेळी हा अपघात झाला होता. कारमधून जात असताना एसटी आणि कारचा अपघात झाला आणि त्यात ते जखमी झाले होते. अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांच निधन झालं अशी माहिती समोर आली" 


दरम्यान नेत्यांची वेगवेगळी विधानं, आरोप-प्रत्यारोप यामुळे आनंद दिघेंच्या निधनाबाबत नेहमी उलटसुलट चर्चा रंगत असतात. सध्या संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानामुळे ही चर्चा नव्याने सुरु झाली आहे.