शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्यांना उमेदवारी दिलीच कशी? राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला सवाल
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीची चुरस वाढत आहे.
पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीची चुरस वाढत आहे. महाविकास आघाडी, भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आपले उमेदवार सचिन शिंदे यांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे. यावेळी पंढरपूरात बोलताना त्यांनी महाविकास आघाडीला घेरले आहे.
'महाविकास आघाडी सरकारनं शेतक-यांच्या एफआरपीचा प्रश्न मार्गी लावावा आणि 100 युनिटपर्यंत घरगुती वीज बिल माफ करावं', अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली आहे.
'सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारच्या अपयशावर बोट ठेवेल असा इशाराही राजू शेट्टींनी दिलाय. ज्या साखर कारखानदारांनी शेतक-यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी?' असा सवाही राजू शेट्टींनी केला आहे.
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वतंत्र उमेदवार दिलाय. त्यामुळे राष्ट्रवादीसमोरील अडचणीच वाढ झाली आहे. आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राजू शेट्टी पंढरपुरात तळ ठोकून आहेत.