पुणे : टीईटी, आरोग्य भरती आणि म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येतेय. पुणे पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत महत्त्वाचे खुलासे केले आहेत. दोन पेपर फुटीच्या प्रकरणाचा तपास करताना म्हाडा पेपरफुटीची लिंक लागली. त्यातून काही लोकांना अटक केली. या तपासात टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा घोटाळाही समोर आल्याचं पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीईटी घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली. सुपे यांनी टीईटी परीक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केलं असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.


असा होत होता घोटाळा


शिक्षक भरती परीक्षा झाल्यानंतर रिचेंकिगवेळी गैरप्रकार होत होता. ज्या विध्यार्थ्यांकडून पैसे घेतले जात होते, त्यांना पेपर रिचेकिंगला द्या असं सांगितलं जात होतं. यासाठी उमेदवाराकडून ३५ हजार ते १ लाख रुपये घेतले जात होते. आतापर्यंत जवळपास साडेचार कोटी जमा झाले आहेत, असा प्राथमिक अंदाज असल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं. आरोपींकडे ८८ लाख रुपये कॅश आणि सोनं सापडलं आहे. 



विद्यार्थ्यांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीच्या आधारे लिंक लागत तुकाराम सुपे यांच्यापर्यंत आलो आहोत असं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे. 


जानेवारी 2020 मध्ये टीईटीची परीक्षा झाली होती. एजंटच्या  मदतीने परीक्षेतील परिक्षार्थींची माहिती मिळवून  त्या परीक्षार्थींना पात्र करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार ते 1 लाखांपर्यंत रकमा स्विकारली जात होती. साधारण  4 कोटी 20 लाख रूपये जमा करुन ते आपापसांत वाटून घेतले आणि  विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केलं. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रीतिश देशमुख 1.25 कोटी आणि अभिषेक सावरीकर यास 1.25 कोटी रुपये घेतल्याचे चौकशीत कबूल केले आहे.