योगेश खरे, नाशिक, विशाल करोळे, औरंगाबाद : राज्यात बँका आणि एटीएम सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत राज्यात मोठ्या प्रमाणात बँक आणि एटीएम लुटीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२२ जून - शनिवारी रात्री पुण्याजवळ यावतमध्ये एसबीआय बँकेच्या एटीएममधून ३० लाखांची लूट


२१ जून – पुणे नाशिक मार्गावर संगमनेरमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडले, १७ लाख १८,४०० रुपयांची लूट


१५ जून – शिरुरुजवळ पेरणे फाटा येथे आयडीबीआयचे एटीएम फोडले, २१ लाख ८६ हजारांची लूट


४ जून- नागपूरमध्ये एसबीआय बँकेच्या एटीएममधून १६ लाखांची लूट


या सगळ्या लुटींच्या घटनांमागे परराज्यातील टोळ्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे दरोडेखोरांकडून राज्यातील बँकावर दरोड्यांचं प्रमाण वाढलं आहे. यात पैशांच्या लुटीसोबतच कर्मचारी आणि ग्राहकांवरही हल्ले होत आहेत.


या महिनाभरात नाशिकमध्ये मुथूट फायनान्स कंपनीवर तर जळगाव जिल्ह्यात रावेरमध्ये दरोड्याच्या घटना अगदी ताज्या आहेत.


१८ जून - रावेर तालुक्यात निंबोल गावात बँक ऑफ बडोदामध्ये गोळीबार, एक ठार


१४ जून – मुथूट फायनान्स कंपनीवर दरोडा, एक ठार, तीन जखमी


११ मार्च – कराड तालुक्यात शेणोली बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेतील सोने आणि रोकड असा २२ लाखांची रोकड लंपास


२२ फेब्रुवारी- पुण्यात मार्केट यार्डमध्ये भरदिवसा एसबीआय बँकेवर दरोडा, २८ लाखांची लूट


८ फेब्रुवारी – कोल्हापूर पन्हाळा तालुक्यात यशवंतपूर को ऑपरेटिव्ह बँकेतून १ कोटी २५ लाखांची रोकड, दागिने लंपास


या घटनांमुळे बँक कर्मचारीही धास्तावले आहेत. त्यांनी सरकारला पत्र लिहून बँका आणि एटीएमच्या सुरक्षेबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. बँक, एटीएम दरोड्यांच्या या घटना दिवसाढवळ्या सुरुच आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार या गुन्ह्यांमध्ये राज्याचा बिहारनंतर चौथा क्रमांक लागतो. बँक प्रशासन सुरक्षेची जबाबदारी पोलिसांवर ढकलत आहे, तर पोलीस खासगी सुरक्षेचे कारण पुढे करत आहेत. यामध्ये लूट होते आहे ती सर्वसामान्य ग्राहकांच्या पैशांची. त्याचबरोबर ग्राहक आणि बँक कर्मचारी यांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.