Majhi Ladki Bahin yojana:  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पंढरपुरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. तलाठी कार्यालय, सेतू ते नागरी सुविधा केंद्रांमध्ये महिलांची गर्दी पहायला मिळत आहे. अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करताना अनेक अडचणी येत आहेत यामुळे अर्जदार महिला त्रस्त झाल्या आहेत. अशातच आता मोबाईलवरुन देखील या योजनाचा लाभ घेता येणार आहे. लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु कण्यात आले आहे. यामुळे लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणे सोईचे होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती. या योजनेसाठी अनेक मार्गांनी तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता. ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालयात जाऊन किंवा अंगणवाडी सेविकांच्या मदतीने किंवा सेतू कार्यालयात हा अर्ज दाखल करता येतो. 


नारीशक्ती दूत नावाच्या अ‍ॅपचा वापर करण्याचा पर्याय


यासह ज्या महिलांना मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठीही राज्य सरकारने नारीशक्ती दूत नावाच्या अ‍ॅपचा वापर करण्याचा पर्याय दिलेला आहे. महिलेच्या डोक्यावर फेटा असं चित्र असलेलं ‘नारीशक्ती दूत’ अ‍ॅप डाऊनलोड करून तुम्हाला अर्ज भरता येऊ शकतो.  त्यासाठी अ‍ॅपमध्ये जाऊन तुमची माहिती भरून आपलं प्रोफाईल तयार करावे.  


नारीशक्ती दूत अ‍ॅपवरुन असा करा अर्ज 


अर्जदार महिलांना नारीशक्ती दूत अ‍ॅपवर सर्व प्रथम प्रोफाईल तयार करावे आहेत. त्यानंतर कॅटेगरीची निवड करा.  त्यानंतर ‘लाडली बहीण योजना’ यावर क्लिक करून नाव, पत्ता, बँक खात्याचे डिटेल्स आणि इतर माहिती भरा. सोबत अर्जदार महिलेचा फोटोही जोडायचा आहे.  शिवाय लागणारी इतर कागदपत्र जोडून तुमचा अर्ज तुम्ही पूर्ण करू शकता. 


मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आलेली गेमचेंजर योजना महाराष्ट्रात


मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आलेली गेमचेंजर योजना आता महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. लाडकी बहिण योजनेतून 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना प्रतिमहिना 1500 रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.