लॉकडाऊनमुळे कुंभार समाज चिंतेत; गणेशमूर्तींवरही कोरोनाचे विघ्न
लॉकडाऊनमुळे गणपती मूर्ती बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य उपलब्ध होत नाही.
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण: कोरोनामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असणाऱ्या लॉकडाऊनने कल्याण परिसरातील कुंभार समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने कुंभार बंधूंची चिंता वाढत चालली असून गेल्या दीड महिन्यापासून सुरू असणारा लॉकडाऊन पुढे वाढतच चालला आहे. परिणामी घर कसं चालवायचं या प्रश्नाबरोबरच आगामी गणेशोत्सवासाठी मूर्ती कशा आणि कधी बनणार याची चिंता त्यांना भेडसावत आहे.
साधारणपणे एप्रिल महिन्यापासून गणपती मूर्तींच्या कामाला कुंभार बांधव सुरवात करतात. मूर्ती बनवण्यासाठी लागणारी मातीही गुजरातमधून येते. याशिवाय, लॉकडाऊनमुळे गणपती मूर्ती बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे लॉकडाऊन असाच वाढत गेला तर गणपती उत्सव होणार की नाही याची मोठी चिंता या कुंभार समाजाला सतावत आहे.
सावध व्हा... सलग दुसऱ्या दिवशी देशात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक
कारण हे कुंभार बांधव गणपती आणि नवरात्रीमध्ये काम करून वर्षभराची पुंजी जमा करतात. याच पैशातून वर्षभर त्यांची गुजराण होते. पण सध्याची एकंदर परिस्थिती पाहता आम्ही काय खायचं ? काय करणार या चिंतेत कुंभार समाज अडकला आहे. सध्या हाताला काहीही काम नसल्याने काही लोक तर भाजी-बिस्किटं विकून पोट भरत आहेत. त्यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या समाजाने केली आहे.
परराज्यातील मजुरांना महाराष्ट्रात रहायचं नाही कारण.....
केंद्र सरकारने नुकताच देशातील लॉकडाऊनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने केवळ आँरेंज आणि ग्रीन झोनमधील निर्बंध शिथील करण्याची मुभा दिली आहे. मात्र, मुंबईसह कल्याण-डोंबिवलीचा संपूर्ण परिसर रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तरी येथील लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्यामुळे अनेकांसमोर रोजगाराचे संकट उभे ठाकले आहे.