नागपूर : नागपुरात महापालिकेच्या फेरीवाला हटाव धोरणाविरोधात मनपावर मोर्चा धडकला. नागपुरात महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यावर शहरात अतिक्रमण विरोधी कारवाईला वेग आला होता. शहरातल्या सर्व १० झोनमध्ये ही कारवाई करण्यात आली. मनपाच्या या कारवाईविरोधात फुटपाथ आणि फेरीवाला दुकानदार संघ आक्रमक झाले. त्यांनी मनपावर मोठा मोर्चा काढला. कॉटन मार्केट चौकातून सिव्हिल लाईन परिसरातील महापालिकेच्या मुख्यालयावर हा मोर्चा धडकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठलीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. फेरीवाल्यांना महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. 


तुकाराम मुंढे यांनी जानेवारीमध्ये नागपूर महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंढे यांची नियुक्ती नवी मुंबई आणि नाशिक महानगरपालिकेत केली होती. नवी मुंबईत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी चांगलेच हैराण केले होते. यानंतर मुंढे गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे एडस् नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. तिथून त्यांची बदली नागपूर महापालिकेत करण्यात आली आहे.


राज्यभरात तुकाराम मुंढे यांची कडक शिस्तीचे आणि सचोटीने नियम पाळणारा अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यामुळे मुंढे यांच्या हाताखालील अधिकारी वर्ग नेहमीच सतर्क असतो. आता त्यांनी नागपूरमध्येही अनेक कामं हाती घेत अनधिकृत कामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.