आताची मोठी बातमी! बुलढाणा पेपरफुटी प्रकरणी SIT पथकाची नेमणूक
HSC Exam Paper Leak: बारावीचा गणितच्या पेपरफुटीप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये परीक्षेच्या अर्धातास आधीपासूनच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाणा (Buldhana) पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणाता आताची मोठी बातमी समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणी SIT तपास पथक स्थापन करण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोनी आरोपी शिक्षकांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. झी 24 तासने पेपरफुटीचं प्रकरण उघड केलं होतं. बुलढाण्यातल्या सिंदखेडराजा इथं गणिताचा पेपर सुरु होण्यापूर्वीच अर्धातास आधी व्हॉट्सअॅपवर व्हायरल (Viral On Whatsapp) झाला होता. झी 24 तासने ही बातमी दाखवल्यानंतर त्याचे पडसाद विधीमंडळातही उमटले होते.
बुलढाण्यात बारावीचा पेपर फुटला
राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु असून या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राबवलेले कॉपीमुक्त अभियान केवळ नावापुरतेच असल्याचे उघड झालं आहे. बारावीच्या परीक्षेत सावळा गोंधळ सुरु आहे. आधी बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तर छापण्याचा प्रकार समोर त्यानंतर गणिताचा पेपरच फुटल्याचा प्रकार घडला. 3 मार्चला बारावीचा गणिताचा पेपर (Mathematics paper) होता. पण सिंदखेडराजा इथं एका परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर फुटला. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धातास आधी पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला.
याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या 5 तरुणांचा समावेश होता. पेपर लीक करणारं मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे. लोणार, बिबी अशा ठिकाणीही तपास यंत्रणेनं धाडी टाकून कारवाई केली. हा पेपर कोणी फोडला? यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे? याची तपासणी केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींवर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
मुंबईतही बारावीचा पेपर फुटला
बुलडाणा पेपरफुटीचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईतही बारावीचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. मुंबईच्या दादर इथल्या डॉ. अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये गणिताचा पेपर फुटल्याचा प्रकार घडला. विद्यार्थी परीक्षाकेंद्रात जाण्यासाठी 23 मिनिटं उरले असतानाच सकाळी 10.17 मिनिटांनी एका विद्यार्थ्याला व्हॉट्सअॅपवर गणिताचा पेपर आला. पोलिसांनी या संदर्भात चौघांवर गुन्हा दाखल केलाय. तीन विद्यार्थ्यांसह एका शिक्षकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परवानगी नसतानाही मोबाईल फोन घेऊन गेला. त्यांचा फोन तपासला असता त्यात गणिताचा पेपर आढळला.