आतिश भोईर, डोंबिवली : लॉकडाऊननंतर ही डोंबिवलीकरांना सलग चौथ्या महिन्यात महावितरणने शॉक दिला आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही डोंबिवलीकरांना विजेची अव्वाच्या सव्वा बिलं पाठवण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीच्या एमआयडीसी निवासी विभाग, मिलापनगर परिसरात मोठी लोकवस्ती असून या भागात अनेकांना सप्टेंबर महिन्यात विजेची वाढीव बिलं आली आहेत. अभिनव बँकेसमोर राहणारे गजानन चौधरी यांना या महिन्यात तब्बल 1 लाख 47 हजार रुपयांचं बिल आलंय. चौधरी हे निवृत्त असून त्यांनी महावितरणकडे दाद मागितली असता बिल कमी न करता ३ हप्त्यात बिल भरण्यास त्यांना सांगण्यात आलं. मात्र एखादा निवृत्ती वेतन धारक महिन्याला 50 हजार तरी कुठून भरेल? असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे.


दुसरीकडे मिलापनगरमध्ये राहणाऱ्या अजय देसाई आणि अर्पिता देसाई या निवृत्त दाम्पत्यालाही या महिन्यात तब्बल 70 हजार रुपये वीजबिल देण्यात आलंय. त्यांनीही आपण इतकं बिल भरूच शकत नसल्याचं सांगत हतबलता व्यक्त केली आहे. या सगळ्यावर महावितरणने मात्र बिल मीटर रिडींगनुसारच देण्यात आल्यानं ते कमी करण्याचा प्रश्नच नसल्याचं म्हटलं आहे. 


या दोन्ही प्रकरणांचा स्पेशल केस म्हणून विचार करून 3 ऐवजी जास्त हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सुविधा देऊ, मात्र बिल कमी होणार नाही, अशी भूमिका महावितरणने घेतली आहे. मात्र दर महिन्यात येणाऱ्या या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे सर्वसामान्यांना मात्र दर महिन्यात शॉक बसतायत. आता आणखी किती रक्त आटल्यावर सरकार या प्रश्नाकडे लक्ष देईल, हाच खरा प्रश्न आहे.