प्रफुल्ल पवार, अलिबाग : निसर्ग चक्रीवादाळाने बुधवारी रायगडच्या किनारपट्टीवर अक्षरशः धुमाकूळ घातला. जवळपास साडेतीन तास हे थैमान सुरू होतं. यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. तर विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळाने रायगडच्या किनारपट्टी भागासह सात तालुक्यांना मोठा तडाखा दिला. यामध्ये झाडे कोसळणे, घरावरील छपरे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या आहेत. दुर्दैवाने यात अलिबाग तालुक्यात विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू झाला.


या वादळाचा फटका किनारपट्टीवरील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यांबरोबरच महाड, माणगाव, पोलादपूर, पेण या तालुक्यांनाही बसला आहे. साडेतीन तासांनंतर हे वादळ शांत झालं. त्यानंतर रस्ते मोकळे करण्याचे तसेच विजवाहक तारांच्या जोडणीचं काम हाती घेण्यात आलं आहे. गुरुवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे.


हे वादळ शांत झालं असलं तरी धोका टळलेला नाही. गुरुवारी दुपारपर्यंत जिल्ह्याच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.


 



निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात मोठी हानी झाली असली तरी नेमके किती नुकसान झालं हे पंचनामे केल्यानंतरच कळून येईल.