कल्याण एसटी डेपोत लोकांची मोठी गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
ना कोणती व्यवस्था, ना सोशल डिस्टन्सिंगचं भान
आतिष भोईर, कल्याण : अनलॉक १ नंतर कालपासून सर्व कार्यालये सुरू झाल्याने कामावर जाण्यासाठी लोकं मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. मात्र लोकलसेवा बंद असल्याने या लोकांनी आपला मोर्चा एसटी डेपोकडे वळवला असून कल्याण एसटी डेपोमध्ये आज सकाळी भयानक गर्दी पाहायला मिळाली.
कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत असताना दुसरीकडे शासनाने अनलॉक १ नुसार लॉकडाऊन शिथिल केल्याने लोकं बाहेर पडू लागले आहेत.
टप्प्याटप्प्याने सर्व उद्योग व्यवसाय आणि खासगी कार्यालयेही सुरू झाली. मात्र कामावर जाण्यासाठी लोकांचा प्रमुख पर्याय असणारी रेल्वेसेवा मात्र अद्यापही बंदच आहे. परिणामी या चाकरमान्यांनी लालपरी म्हणजेच एसटीकडे आपला मोर्चा वळवला आहे. कल्याण एसटी डेपोमध्ये आज तोबा गर्दी झालेली पाहायाल मिळाली. कोणतेही सोशल डिस्टन्स नाही की सुरक्षित अंतर नाही. नेहमीप्रमाणे गाड्या पकडण्यासाठी धक्काबुक्की करताना लोकं दिसत होते.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव देशात चिंतेचं वातावरण बनलं असताना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय सरकारसाठी आणखी मोठं आव्हान तर उभं करणार नाही ना? याची भीती आता वाटू लागली आहे. कामावर जाण्यासाठी लोकांची होणारी ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात नक्कीच अपयशी ठरणारी आहे. एवढं नक्की.