रविंद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : सांगलीत मानवी तस्करीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय. एका अल्पवयीन मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हाणून पाडलाय. धक्कादायक म्हणजे, या तीन आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पवयीन मुलीची विक्री करू पाहणाऱ्या नाझिया मेहबूब शेख (वय - ३३ वर्षे, रा. नांदेड नाका, लातूर) लियाकत लायक शेख (वय - २४ वर्षे, रा. हारंगुळ बुद्रुक, लातूर) आणि बळीराम विठ्ठल विरादार (वय - २५ वर्षे, रा खांडगाव रोड, लातूर) या तिघांना अटक करण्यात आलीय. हे तिघे एजंट म्हणून अल्पवयीन मुलीची विक्री करण्याचा प्रयत्न करत होते. तर चौथा आरोपी सुभाष हा एजंट अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत तिला अनैतिक कृत्यासाठी विकण्याचा डाव या तिघांनी रचला होता. यासाठी आरोपी नाझिया शेख हिनं विकास कांबळे नावाच्या व्यक्तीकडे ५२ हजार रुपयांची मागणी केली होती. फिर्यादी विकास कांबळे यांनी ही माहिती पोलिसांना दिली. विकास यांच्याकडून 'गुगल पे'वरून ऍडव्हान्स म्हणून २००० रुपये घेऊन आरोपींकडून उरलेली रक्कम सांगलीत द्यायला सांगितली गेली.



ठरल्याप्रमाणे आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन सांगलीत दाखल झाले. अफरीन पठाण यानं अल्पवयीन मुलीला विकास कांबळे यांच्याकडे सोपवलं. त्याबदल्यात ५० हजार रुपये त्यांच्याकडून घेतले. याच दरम्यान पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ अटक केलीय.