शशिकांत पाटील, झी मीडिया लातूर : आठ महिन्याच्या गरोदर स्त्रीला घेऊन चालत काही मजूर ७०० किमी दूर मध्यप्रदेशातील आपल्या गावी निघाले होते. मात्र लातूर जिल्ह्यातील औसा इथे पोलिसांनी त्यांना अडवून जवळपास १६ दिवस क्वारंटाईन केलं. गरदोर स्त्रीला घेऊन चालत निघणाऱ्या मजुरांची माहिती औसा येथील काही तरुणांनी कळाली आणि त्यांनी त्यांची गाडीने जायची सोय केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूरमध्ये मजुरी करण्यासाठी आलेले हे मध्यप्रदेशातील मजूर आहे. लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे आणि हाताला काम नसल्यामुळे यांचे खाण्या-पिण्याचे मोठे हाल झाले. त्यात ज्या मालकासाठी काम केले तो सोलापूरला राहत असल्यामुळे हे ०७ ते ०८ लातूरहून सोलापूरला निघाले ते ही पायी. ज्यात ही आठ महिन्याची गरोदर स्त्री संगीताबाई ही होती. तळपत्या उन्हाची परवा न करता सोलापूरहून मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात जाण्याचा त्यांचा बेत. मात्र पुढे १८ किमीवर अंतरावर औसा इथे पोलिसांनी या सर्वाना अडवून एका अंगणवाडीत क्वारंटाईन केलं. 


गरोदर स्त्रीला घेऊन मजूर मध्यप्रदेशात जाणार असल्याची माहिती औसाचे तरुण नगरसेवक समीर डेंग आणि त्यांच्या मित्रांना समजलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करून त्यांचे पासेस बनविले. मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात जाऊन येण्यासाठी बोलेरो गाडीचा ३६ हजाराचा खर्च येत होता. यात काही हजार त्या मजुरांकडे होते. तर उर्वरित रक्कम ही समीर डेंग आणि त्यांच्या मित्रांनी काँट्रीब्युशन करून जमविली आणि त्यांच्या जाण्याची सोय केली. 


मुळात प्रशासनाच्यावतीने मजुरांना जाण्यासाठी आपल्या राज्याच्या सीमेपर्यंत घेऊन जाण्याची सोय होती. मात्र गरोदर स्त्री असल्यामुळे त्यांना कसलाही त्रास होऊन नये म्हणून औसा येथील तरुणांनी काँट्रीब्युशन करून माणुसकीच्या नात्याने ही मदत केल्याचे हे तरुण सांगतात. 


या सगळ्यात देवदूतासारखे धावून आले ते पोलीस. जर पोलिसांनी त्यांना वेळीच थांबवले नसते रखरखते ऊन, घसा कोरडा करणारी तहानेने व्याकुळ होत या पोटुशी स्त्रीला घेऊन हे सगळे कुठपर्यंत गेले असते देवच जाणो. आता औसा येथील तरुणांनी थेट जाण्याची व्यवस्था केल्यामुळे त्यांचा प्रवास तर सुखकर झालाच पण माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे अधोरेखित झालं.