अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : सरकारी नोकरीच्या अमिषातून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचं प्रकरण पुण्यात उघडकीस आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात भाजपच्या एका पदाधिका-यावर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान या पदाधिका-याला पक्षातून निलंबीत करण्यात आलं.


कशी केली फसवणूक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सारिका धोंडीराम चव्हाण उस्मानाबादच्या राहणाऱ्या आहे. पैसेही गेले आणि नोकरीही नाही अशी त्यांची अवस्था झालीय. स्वतःला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कामगार संघटनेचा नेता म्हणवणाऱ्या जितेंद्र भोसलेनं त्यांना नोकरीचं आमिष दाखवलं होतं. वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा विविध पदांवर नियुक्ती करण्यात येणार असल्याचं भोसलेकडून सांगण्यात आलं. त्यासाठी त्यानं सारिका तसेच त्यांच्यासारख्या इतरांकडून प्रत्येकी ६ लाख ते १० लाख रुपये उकळले. बनावट कागदपत्रांच्या साहाय्यानं त्यानं ही फसवणूक केलीय. इतकच नाही तर पुण्यातील ससून रुग्णालयात उमेदवारांच्या बनावट मुलाखतीही घेण्यात आल्या होत्या.   


७०० ते ८०० लोकांची फसवणूक


अशाप्रकारे फसवणूक झालेली सारिका एकटीच नाही. तर सुमारे ७०० ते ८०० लोकांना भोसलेंनं गंडा घातल्याचा आरोप होतोय. त्यांच्याकडून प्रथमदर्शनी किमान ३० कोटी रुपये घेतले गेल्याचा अंदाज आहे. बनावट कागदपत्र असो वा पैसे दिल्याच्या पावत्या, त्याबाबतचे सगळे पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. सप्टेंबर २०१६ पासून हा प्रकार सुरु आहे. नोकरी दिली नाही म्ह्णून पैसे परत मागायला गेलेल्यांना भोसले आणि त्याच्या माणसांनी मारहाण करून परत पाठवल्याचाही आरोप आहे. या प्रकरणामध्ये मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. 


नवी मुंबई भाजपचा वरिष्ठ पदाधिकारी


या प्रकरणी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचं फसवणूक झालेल्या लोकांनी सांगितलय. फसवणूक केल्याचा आरोप असलेला जितेंद्र भोसले नवी मुंबई भाजपचा वरिष्ठ पदाधिकारी आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांसोबत त्याचे संबंध आहेत. त्या नेत्यांच्या नावाचाही त्यानं गैरवापर केल्याचं दिसत आहे. त्यामुळे पोलीस कारवाईबरोबरच पक्षदेखील या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेईल अशी अपेक्षा आहे.