विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : मराठवाड्यात कोरोनाकाळात शेकडो ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं रॅकेट झी 24 तासनं उघड केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. झी 24 तासनं याचा पाठपुरावा केल्यानंतर या गर्भपिशवी काढलेल्या मजूर महिलांचा वेदनादायी प्रवास अजूनही थांबवलेला नसल्याचं पुढं आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गर्भपिशवीला सूज आलीय असं सांगून डॉक्टरांनी एका ऊसतोड महिलेला गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला. इतकच नाही तर कॅन्सरची भीतीही दाखवण्यात आली. अखेर या महिलेनं तब्बल 20 हजार रूपये खर्च करून गर्भपिशवी काढून टाकली. पण त्यांच्या वेदना कमी झाल्याच नाहीत. उलट त्रास आणखीच वाढला आहे. शिवाय शरीराचा एक अविभाज्य भाग गमावल्याचं दु:ख उराशी आहे ते वेगळंच...बीड जिल्ह्यात गर्भपिशवी काढलेल्या शेकडो महिलांच्या बाबतीत हाच प्रकार घडला आहे. 


बीड जिल्ह्यातील आणखी एका पीडितेचीही हीच व्यथा आहे. गेल्या 25 वर्षांपासून त्या ऊसतोडीचं काम करत आहेत. अहोरात्र काम करताना शाररीक व्याधींकडे दुर्लक्ष झालं. मग डॉक्टरांनी त्यांना कॅन्सरचा बागुलबुवा दाखवून गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला. त्यातून डॉक्टरांचे खिसे तर भरले पण ही महिला मात्र कायमची अधू झाली. ऑपरेशनमुळे काम होत नाही. पण तरीही जगण्यासाठी त्यांना हातात कोयता घेण्याशिवाय पर्याय नाही. 



या प्रकरणात सखोल चौकशी करून पीडित महिलांना न्याय देण्याची मागणी जोर धरू लागलीय. जिल्ह्यात महिलांचा सर्वे झाला पाहिजे, किती महिला आहेत, गर्भपिशव्यांचं नेमकं केलं काय? गरज नसतानाही काही गर्भपिशव्या काढण्यात आल्या, त्या का काढल्या याची चौकशी झाली पाहिजे, आणि या महिलांना तात्काळ आर्थिक मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.


ऊसतोड महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या गर्भावरच अनेक नराधम डॉक्टरांनी डल्ला मारलाय. मात्र ढिम्म असलेलं प्रशासन अशा नरधमांना कठोर शिक्षा देण्यासाठी हालचाल करणार आहे की नाही हा खरा सवाल आहे. अन्यथा आणखी हजारो महिलांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरू राहणार.