नवाब मलिकांना अण्णांची नोटीस, म्हणाले...
अण्णा पैसे घेऊन उपोषण मागे घेतात असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं होतं.
मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अण्णा पैसे घेऊन उपोषण मागे घेतात असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं होतं. ज्यानंतर त्यांच्या वकिलांनी मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचं वृत्त समोर येत आहे.
अण्णा हजारे संघ आणि वकिलांकडून पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिकांनी जाहीर लेखी माफी मागावी आणि तसा खुलासा करावा अशी मागणी या नोटीसच्या माध्यमातून करण्यात आली आहे. असं न केल्यास मलिक यांच्याविरोधात फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल करावा लागेल असा इशाराही या नोटीसच्या माध्यमातून त्यांना देण्यात आला आहे. मुख्य म्हणजे एकिकडे मलिक यांनी अण्णांवर अशा प्रकारचे आरोप केलेले असतानाच इथे अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
उपोषणाचा आज पाचवा दिवस, अण्णांची प्रकृती खालावली
गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या या उपोषणामुळे परिणामी अण्णांची प्रकृती खालावत असल्यामुळे ही बाब चिंतेचा विषय ठरत आहे. सलग पाच दिवसांच्या उपोषणामुळे त्यांच्या शरीरावर याचे परिणाम दिसत असून, अण्णांच्या यकृतावर परिणाम झाला आहे. शिवाय त्यांना रक्तदाबाचाही त्रास होत आहे. उपोषण यापुढेही सुरु राहिल्यास त्याचा मेंदू आणि किडमीवर परिणाम होणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात लोकपाल, लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारपासून अण्णांनी उपोषण सुरू केलं होतं.