उपचारासाठी बायकोला खांद्यावर घेऊन नवरा निघाला, पण ही कहाणी अधुरीच राहिली...
धो धो कोसळणारा पाऊस, अंगाला झोंबणारा वारा, खळकाड रस्त्यातून पाय वाट, उतार चढ ओलांडत हा नवरा बायकोला खांद्यावर घेऊन हॉस्पिटलकडे निघाला
नंदूरबार : नंदूरबार जिल्ह्यातील ही घटना आहे. सिदलीबाई यांच्या पतीने त्यांना जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याचा अटोकाट प्रयत्न केला, पण त्यांच्या वाटेत आलेल्या अडथळ्यांपुढे त्यांचं काहीच चाललं नाही. नंदुरबार हा आदिवासी बहुल आणि दुर्गम भागाचं प्रमाण जास्त असलेला जिल्हा आहे. येथील वाड्यांना जोडणारे रस्ते डोंगर कपाऱ्यातून जातात आणि अचानक आलेल्या पावसामुळे दरड कोसळल्याने सिदलीबाई यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचता आले नाही.
धो धो कोसळणारा पाऊस अंगाला झोंबणारा वारा, खडकाळ रस्त्यातून पाय वाट, उतार चढ ओलांडत हा नवरा बायकोला खांद्यावर घेऊन हॉस्पिटलकडे निघाला होता.
कोणतंही वाहन रस्त्यावर जावू शकत नसल्याने सिदलीबाई पाडवी यांच्या पतीने त्यांना खांद्यावर घेतलं, पायपीट किती करायची याचा विचार केला नाही. पण ही कहाणी अधुरीच राहिली कारण सिदलीबाई पाडवी यांनी रस्त्यात नवऱ्याच्या खांद्यावरच प्राण सोडले.
कारण रस्त्यावर दरड कोसळल्याने ते आणखी पुढे जावू शकत नव्हते. नंदूरबारमधील चांदसोलीच्या सिदलीबाई रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे.
सिदलीबाई यांनी जेव्हा वाटेतच नवऱ्याच्या खांद्यावर प्राण सोडले तेव्हा त्यांच्या पतीला ना रडता येत होतं, ना आपली व्यथा कुणाला सांगता येत होती, पतीच्या मृत्यूनंतरही त्यांची पायपीट थांबली नाही, त्यांना बसला आलं नाही, कारण त्यांना पुन्हा घरी सिदलीबाईच्या पार्थिवासह परतायचं होतं...