सांगली : मला न्यायालयाची नोटीस आली आहे, निवडणूक लढत असताना जसा लोकांवर माझा विश्वास होता, त्याच प्रकारे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मी कुठल्याही चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढलो नाही, हे मला माहिती आहे. लोकांना माहिती आहे. त्यामुळे राम शिंदे गेले असले तरी त्या ठिकाणी ज्यापद्धतीने कर्जत जामखेडमध्ये विधानसभेमध्ये विजय मिळाला. हा विजय त्याठिकाणच्या लोकांच्या आशीर्वादामुळे झाला. तसेच न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. विजय हा सत्याचाच होईल. त्या ठिकाणी माझी बाजू योग्य असेल, असे मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजप उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला. त्यानंतर राम शिंदे यांनी रोहित पवार यांना निवडणुकीवर त्यांनी आक्षेप घेतला. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना औरंगाबाद खंडपीठाने ही नोटीस दिली आहे. माजी आमदार राम शिंदे यांनी केलेल्या निवडणूक याचिकेनंतर रोहित पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस मिळाल्याची माहिती रोहित यांनी दिली.



रोहित पवार यांनी मतदारांना लाच देणे, प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदे यांची बदनामी करणे, निवडणूक खर्चाचे तपशील लपवला आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे, आरोप राम शिंदे यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.


तसेच रोहित यांनी बारामती अॅग्रो लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना प्रचारासाठी आपल्या मतदारसंघात आणले होते. त्यानंतर कर्मचारी घरोघरी जाऊन मतदारांना प्रभावित करायचे, असाही आरोप त्यांनी केला आहे. एवढे करुनही त्यांनी निवडणूक खर्चही लपवून ठेवला आहे, असा थेट आरोप राम शिंदे यांनी केला आहे.