नागपूर: शिवसेनेने जनादेशाचा अनादर केला, या भाजपच्या टीकेला गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत सडेतोड प्रत्युत्तर दिले. काँग्रेसशी युती करून शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले नव्हते, ही गोष्ट खरी आहे. परंतु, मी कायम भाजपची पालखी वाहणार नाही, अशा शब्दही बाळासाहेबांना दिल्याचे सांगत उद्धव यांनी भाजपला फटकारले. तसेच देवेंद्र फडणवीस यांना कधीपासून दिलेल्या शब्दाचे कौतुक वाटायला लागले, असा टोला हाणत उद्धव ठाकरे यांनी हिशेब चुकता केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून शेतकरी कर्जमाफी, राज्यावरील कर्जाचा बोजा आणि जनमताचा अनादर केल्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. संत ज्ञानेश्वरांच्या भारूडाचा संदर्भ देत त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकारची यथेच्छ खिल्लीही उडविली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणातून फडणवीसांच्या टीकेला जशास तसे प्रत्युत्तर दिले. 


उद्धव यांनी 'सामना'तील शरद पवारांविषयीची वक्तव्ये, राज्याची आर्थिक स्थिती आणि कर्जमाफी याविषयी देवेंद्र फडणवीसांनी केलेला प्रत्येक दावा खोडून काढला. 'सामना'तील प्रत्येक शब्दाला मी बांधील आहे. आम्ही सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले होते. याच 'सामना'त मोदींनी पवार माझे गुरु असल्याची बातमी छापून आली होती. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी सोयीचे तेवढे वाचले. ही गोष्ट योग्य नाही, असे उद्धव यांनी म्हटले. 


'मी नवखा आहे, तुमच्याकडून अर्थशास्त्र शिकायला आवडेल'


आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मराठी चित्रपटातील 'नया है वह' या संवादाचा दाखला दिला. माझ्याबाबतीत 'नया है वह' अशी परिस्थिती असेल. राज्याची आर्थिक स्थिती, सकल राष्ट्रीय उत्पादन या गोष्टींबाबत मला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चार गोष्टी शिकायला आवडतील, असे उद्धव यांनी सांगितले. 


'एमएमआरडीए राज्याबाहेरील संस्था आहे का?'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आपल्या भाषणात राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला होता. महाविकासआघाडीकडून महाराष्ट्राच्या डोक्यावर असलेल्या कर्जाची रक्कम फुगवून सांगितली जात आहे. सर्वच कर्जांसाठी राज्य सरकार उत्तरदायी नसते. सकल राष्ट्रीय उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या कर्जांची जबाबदारीच राज्यावर असते. इतर बाह्य कर्जांची थेट जबाबदारी राज्यांवर येत नाही, असे फडणवीसांनी म्हटले होते. त्यासाठी फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या कर्जाचे उदाहरण दिले होते. ही संस्था व्यावसायिक तत्वावर प्रकल्प उभारते. त्यामुळे त्यांच्या कर्जाचा राज्याशी काही संबंध नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, उद्धव यांनी हा दावा फेटाळून लावला. एमएमआरडीए ही राज्याबाहेरील संस्था आहे का? एमएमआरडीएची आर्थिक स्थिती भक्कम आहे. पण उद्या त्यांनी कर्ज बुडवले तर ती जबाबदारी राज्यावरच येणार नाही का, असा प्रतिसवाल उद्धव यांनी उपस्थित केला.