`माझा अपमान झाला होता!` लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांनी माघार का घेतली?
छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार होते. मात्र, एनवेळी त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. लोकसभा निवडणुकीतून माघार का घेतली याचा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे.
Chhagan Bhujbal On Loksabha Election : माझा अपमान झाल्यानं लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. अमित शाहांनी सांगितलं म्हणून निवडणुकीला तयार झालो. मात्र शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही, तो अपमान होता, असं भुजबळ या मुलखतीत म्हणाले.
पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी केली होती लोकसभा उमेदवारीतून पूर्णपणे माघार घेतल्याची घोषणा
नाशिक लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. मात्र, महायुतीतर्फे अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याआधीच नाशिक लोकसभा उमेदवारीतून पूर्णपणे माघार घेत असल्याचे छगन भुजबळ यांनी जाहीर केले होते. पत्रकार परिषद घेत भुजबळांनी स्वत: ही घोषणा केली होती. यावेळी त्यांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आपण नाशिक लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून आग्रही होते असंही भुजबळांनी सांगितल होते. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनीही याला दुजोरा दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, आपण स्वत: या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केल असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे भुजबळ म्हणाले होते. त्यावेळी भुजबळ यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आता छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिक लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी
दरम्यान नाशिक लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर केली. नाशिकमधील भाजपनं गोडसेंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला. तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी श्रीकांत शिंदेंना अधिकार नसल्याचं म्हणत, महायुतीमध्ये शिस्त पाळली पाहिजे असं सुनावल होते. श्रीकांत शिंदे बोलले म्हणून कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही असं म्हणत, संजय शिरसाट यांनी छगन भुजबळांना सुनावल होते. दुसरीकडे स्वामी शांतिगिरी महाराज हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.