मतं खाण्यासाठी वंचितकडून पुण्यात मिळाली उमेदवारी? वसंत मोरे म्हणाले, `आपण कोणाची...`
Vasant More Pune Loksabha Election: वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. मोरे आता पुण्यातून लोकसभा लढणार आहेत.
Vasant More Pune Loksabha Election: वसंत मोरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्य आणि इतर सर्व पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची सर्वांनाच उत्सुकता होता. अखेर वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी घोषित केली आहे. वसंत मोरे यांना उमेदवारी जाहिर होताच त्यांनी किमान 50 हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पुण्यातील उमेदवार वसंत मोरे यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली आहे. वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मनसेच्या इंजिनाची निवडणूक लढण्याची तयारी नव्हती म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरलो असल्याची प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. आपण कोणाची मत खाण्यासाठी नव्हे तर निवडून येण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढवत आहोत. किमान पन्नास हजारपेक्षा जास्त मतांनी आपण विजयी होऊ, असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे.
दरम्यान, वंचितने वसंत मोरे यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता पुण्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. यांच्या उमेदवारीबाबत बोलताना मोरे यांनी म्हटलं आहे की, भाजपचे मुरलीधर मोहोळ तसेच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे दोघेही आपले मित्र आहेत. पण पुण्यातून आपणच शंभर टक्के विजयी होणार, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे.
वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांचे पुण्यात जोरदार स्वागत झाले. कार्यकर्त्यांनी फटाकू वाजवून तसंच औक्षण करुन आनंद साजरा केला. दरम्यान, वसंत मोरे यांना वंचितने पुण्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचबरोबर नांदेड , परभणी, औरंगाबाद , पुणे आणि शिरूरमध्ये वंचितने उमेदवार दिले आहेत.
वंचितचे उमेदवार कोण?
वंचितकडून जाहीर झालेल्या यादीत नांदेडच्या जागेवर अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिलीये. तर परभणीतून बाबासाहेब उगले यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मधून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिरूरमधून वंचितने मंगलदास बांदल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.