धोंडीबाचं केलं कोंडीबा! पूजा खेडकरच्या कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा, बारामती कनेक्शनसमोर
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक माहिती उघड झाली आहे. खेडकर कुटुंबीयांचा कारनामा उघड झाला आहे.
IAS Pooja Khedkar: वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर यांचे वडिल दिलीप खेडकर यांनी एका जमिनीच्या सातबारातील नावात बदल केल्याचे समोर आले आहे. सातबारावर वडिलांचे नाव धोंडीबाचे कोंडिबा केले आहे. या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे पूजा यांचे वडील दिलीप खेडकर यांनी बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे असलेल्या 14 गुंठे जमिनीच्या सातबारातील आपल्या नावातील वडिलांचे नाव बदलले आहे. दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे.
दिलीप कोंडीबा खेडकर यांनी 14 वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली आहे. त्याचा सातबारा ही उपलब्ध आहे. वागळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचे पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणले होते. ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबीयांनी तसा बोर्ड लावला आहे. दीड कोटी जमिनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आता त्या जमिनीच्या सातबारावर नाव बदलण्यात आले असून कोंडीबा केले आहे. नव्याने 7/12 वरील नाव बदल्याने दिलीप कोंडिबा खेडकर? आणि दिलीप धोंडीबा खेडकर? कोण की एकच व्यक्ती आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
'त्या' कंपनीचा लिलाव होणार?
वादग्रस्त आयएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरीटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित कंपनीने 2 लाख 72 हजारांचा कर अद्यापही भरला नाही. आधीच जप्तीची कारवाई केलेल्या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी माहिती करसंकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे. याच कंपनीचा पत्ता पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वायसीएल रुग्णालयाला रेशन कार्ड मार्फत दिला होता. आता या कंपनीवर लिलावाची कारवाई होऊ शकते
पूजा खेडकर अद्याप बेपत्ताच!
पूजा खेडकर सध्या बेपत्ता आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात त्यांनी स्वतः दिलेल्या तक्रारीवर जबाब नोंदवण्यासाठी त्या पुण्यात येणार होत्या. मात्र त्याआधी त्यांच्याच विरोधात यूपीएससी कडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना 23 जुलैपर्यंत मसुरीच्या लालबहादूर शास्त्री अकादमी मध्ये हजर होण्यास सांगण्यात आलं होतं. असं असताना त्या ना पुण्यात आल्या ना मसुरीला पोहोचल्या. दरम्यान आपण काही कारणास्तव अकादमीत हजर होऊ शकत नसल्याचा मेल त्यांनी पाठवल्याचं कळतंय. असं असलं तरी पूजा खेडकर नेमक्या आहेत कुठे असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे.