औरंगाबाद: शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. ते शनिवारी औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले की, शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडले, असा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला.


या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कर्जमाफीच्या सदोष अंमलबजावणीसंदर्भातही भाष्य केले. शिवसेनेला कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती हवी आहे. काही निर्णय घेताना आर्थिक बाबींचाही विचार करावा लागतो. त्यामुळे दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले. मात्र, अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळूनही हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत. मी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत विचारणा केली असता आम्ही बँकांना केव्हाच पैसे दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कृषी कर्जवाटपात दिरंगाई करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


सरकारी योजना या चांगल्या आहेत. मात्र, यंत्रणेतील त्रुटीमुळे त्या शेवटपर्यंत पोहोचल्या नाहीत. याचे खापर साहजिकच सत्ताधारी पक्षावरच फुटते. त्यामुळे मला कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे नाही. पिकविमा योजनेतही मोठा घोटाळा झाला आहे. विमा कंपन्यांच्या दलालांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. हे सगळे प्रश्न घेऊन मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटेने, असे आश्वासन उद्धव यांनी दिले.


औरंगाबादनंतर उद्धव ठाकरे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथल्या पिक विमा केंद्राला भेट देऊन तिथल्या शेतकऱ्यांशी उद्धव संवाद साधतील.