मुंबई: पक्षात माझ्यावर वारंवार अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करेल, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दिला. ते शनिवारी भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी खडसे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. उत्तर महाराष्ट्राची बैठक असताना मला केवळ जळगाव जिल्ह्याच्या बैठकीपुरतेच बोलवण्यात आले. अशाप्रकारे मला निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे. कोअर कमिटीतूनही काढून टाकण्यात आले आहे. पक्षातील काही नेते मला टार्गेट करत आहेत. माझ्यावर अन्याय, अत्याचार होत राहिल्यास मला वेगळा निर्णय घ्यावाच लागेल. मी काही देव नाही. पण निर्णय घेताना पक्षाला सांगूनच निर्णय घेईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांचा पराभव झाल्यामुळे एकनाथ खडसे पक्षावर नाराज आहेत. रोहिणी खडसे यांना पाडण्यासाठी भाजपमधीलच काहीजणांनी रसद पुरवली, असा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य नेत्यांकडून खडसेंची समजूत काढली जाईल, अशी शक्यता होती. 


मात्र, बैठकीतून बाहेर पडताना खडसे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या भावना बोलून दाखवल्या. मला पक्षापासून दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता मी काय केलं पाहिजे, हे मी कार्यकर्त्यांनाच विचारणार आहे. मी पक्ष सोडणार नाही. हे मी अनेकवेळा सांगितलं आहे. पक्ष विस्तारासाठी मी चाळीस वर्ष योगदान दिलं आहे. त्यामुळे मी पक्ष कसा सोडेल? मात्र, सतत अन्याय झाल्यास मी काही देव नाही, मी माणूस आहे, मलाही भावना आहेत. त्यामुळे माझ्यावर अन्याय होतच राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल, असे खडसे यांनी सांगितले.