MLA Santosh Bangar : विधानसभा अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी शिंदे गटाला समर्थन देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे गेल्यानंतर संतोष बांगर यांनी या सर्वांना परत येण्याचे आवाहन केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे आवाहन करताना त्यांना अश्रूदेखील अनावर झाले होते. मात्र त्यानंतर बांगर स्वतःच शिंदे गटात सामील झाले होते. यानंतर संतोष बांगर यांच्यावर टीकाही करण्यात आली होती. त्यानंतर बांगर यांनीही  गद्दार म्हणू नका, नाहीतर आमचे शिवसैनिक कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते.


आता पुन्हा एकदा आमदार संतोष बांगर हे चर्चेत आले आहेत. बंडखोरीनंतर आमदार संतोष बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्यांना हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी बंडखोर आमदारांच्या गाड्या फोडण्यास सांगितले होते.


जो गाडी फोडेल त्याचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बहुमान


"ज्या देव माणसामुळे तुम्ही आमदार झालात त्यांच्याच पाठीत तुम्ही खंजीर खुपसलात. तुम्हाला आता गावत येऊ देणार नाही. जे जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक आहेत त्यांना माझे आवाहन आहे, ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये या गद्दारांच्या गाड्या येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केला जाईल. या भामट्यांना आता ठेचायचे आहे," असा इशारा बबनराव थोरात यांनी दिला होता.


बबनराव थोरात यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्या गाड्या तुमच्या घराच्या पुढे आणून उभ्या करतो. गाडीला नुसते टच जरी करुन दाखवले तर मी राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही, असे संतोष बांगर यांनी म्हटले आहे.