चार दिवस अतिवृष्टीचा इशारा; राज्याला रेड अलर्ट, `या` जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Update: राज्यात येत्या चार-पाच दिवसांत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. हवामान विभागाने राज्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Rain Alert: जुलैच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने राज्यात जोर धरला आहे. मुंबई, पुणेसह राज्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे. तर, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. मात्र, राज्यात आता पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. (Weather Today At My Location)
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. अरबी समुद्राकडून येणारे तीव्र पश्चिमी वारे बाष्प घेऊन येत असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाट माथ्यावरही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया याभागातही येत्या काही दिवसांता मुसळधार पाऊस बरसणार आहे.
घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्यावे पर्यटकांनी तिथे गर्दी केली आहे. मात्र हवामान विभागाने अत्यावश्यक नसेल घाटमाथ्यावर प्रवास टाळावा, असा इशारा केला आहे.
जळगावमध्ये पावसाचा हाहाकार
मध्यरात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यात हाहाकार माजला आहे.पावसाने केलेल्या तांडवामुळे नदी नाल्यांना अचानक आलेल्या पुरामुळे रावेर शहरातील दोन जण बेपत्ता झाले असुन मोरव्हाल येथील एक जणाचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कोकणात पावसाला चांगली सुरुवात
कोकणात पाऊस चांगलाच बसतोय. त्यामुळे इथल्या पाणीसाठ्यांमध्ये चांगली वाढ झाली आहे.रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण पूर्णपणे भरले असून सध्या ओसंडून वाहत आहे. त्यामुळे रत्नागिरी शहराची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
बीडमध्ये मान्सून उशीराने
उशिरा का होईना बीड जिल्ह्यामध्ये मान्सूनने चांगली हजेरी लावलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये काल चांगला पाऊस झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना पेरणी करता येणार आहे. मागील महिनाभरापासून बीड जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडला असला तरी बीड जिल्ह्यामध्ये मात्र पावसाने पाठ फिरवली होती. दोन दिवसात चांगला पाऊस झाल्याने पुढील दोन दिवसांमध्ये पेरणीला सुरुवात होईल. यंदा कापसाचं प्रमाण घटणार असून सोयाबीनचे प्रमाण अधिक वाढेल अशी देखील परिस्थिती आहे