विदर्भात आज उष्णतेची लाट तर 2 दिवस कोकणात अवकाळी पावसाचा इशारा
तुमच्या जिल्ह्यात कसं असणार हवामान? पाहा कुठे पडणार पाऊस आणि कुठे येणार उष्णतेची लाट
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये तपमानात कमालीचा बदल होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पारा 41 पार गेला आहे. तर दुसरीकडे आता अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. लोक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले आहेत.
राज्यात एकीकडे कमाल तापमानात वाढ होत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे तर दुसरीकडे कोकणात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक ठिकाणी 40°C पेक्षा जास्त कमाल तापमान आहे.
हे तापमान हळूहळू सामान्य होत आहे . मात्र नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक असल्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. हवामान विभागाने म्हटल्या प्रमाणे मार्चच्या तुलनेत एप्रिल 2022 अधिक गरम असू शकतो. आधीच मार्च 2022 तुलनेत जास्त उष्ण होता.
विदर्भात आज उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तर राज्यात उष्माघाताने बळी गेल्याचीही घटना याआधी समोर आली होती. दुसरीकडे कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.