महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; संसदेत या खासदारांची आक्रमक मागणी
परमबीर यांच्या पत्राचे थेट दिल्लीत पडसाद
मुंबई : परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनविन घडामो़डी घडत आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करीत आहेत. याप्रकरणाचे पडसाद आज संसदेतही दिसून आले. खासदार गिरीश बापट, नवनित राणा, पुनम महाजन आदींनी संसदेत आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बप्रकरणाचे दिल्लीतही पडसाद उमटत आहेत. संसदेत भाजप खासदार यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर कडाडून टीका केली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा. अशी मागणी केली.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील संसदेत आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. निलंबित केलेल्या सचिन वाझेंची पुनर्नियुक्ती का केली? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला तरीही
परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनाम्याची मागणी करत आहोत. तर शिवसेनेला का मिरच्या लागताय अशी टीका भाजप खासदार पूनम महाजन यांनी केली.
शिवसेनेच्या खासदार विनायक राऊत यांनी देखील महाविकास आघाडीची बाजू लावून धरत महाराष्ट्रात भाजप सरकार आणण्याच्या केंद्राच्या हालचाली सुरू असल्याची टीका केली.