दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे सरकार लॉकडाऊन कधी हटवणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु पूर्वीची परिस्थिती लक्षात ठेवून एक गोष्ट नक्की की, ठाकरे सरकार यावेळी लॉकडाऊन खोलायला घाई करणार नाही. यामुळे राज्यातील लॉकडाऊनवरील निर्बंध एका झटक्यात काढून टाकण्याऐवजी ते चार टप्प्यात काढले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. 1 जूनपासून ठाकरे सरकार लॉकडाऊन हटवण्यास सुरवात करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. यामुळे पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात राज्य सरकार प्रथम दुकाने सुरू करणार आहेत.


रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतर शिथिल होण्याची शक्यता


- राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होतेय
- त्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात
- आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे मंत्री विजय वड्डेटीवार यांची माहिती
- रेड झोनमधील जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आठवड्याभर आढावा घेऊन जिल्हा निहाय त्याबाबत निर्णय घेतले जातील
- रेड झोनमधील जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी झाली नाही तर कडक लॉकडाऊन कायम राहणार
- मुंबईतील लोकलमध्ये गर्दी होते, त्यामुळे लोकल पुढील १५ दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही
- रुग्णसंख्या वाढत असणाऱ्या जिल्ह्यात घरी क्वारंटाईन करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे, तिथे कोविड सेंटर किंवा संस्थेमध्येच क्वारंटाईन केलं जाणार


कोरोना रेड झोनमधील राज्यातील जिल्हे


बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, उस्मानाबाद


तिसरा टप्पा


तिसर्‍या टप्प्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार आणि दारुची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. यानंतर चौथ्या टप्प्यात सामान्य लोकांसाठी लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरू करण्यात येतील. म्हणजेच 15 जूनपर्यंत सामान्य प्रवाश्यांसाठी लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता नाही. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने स्वतंत्र लॉकडाऊन लागू केला आहे, त्यामुळे त्या भागाची परिस्थिती बघून यावर विचार केला जाईल.


मुंबईतील लसीकरणासंदर्भात महत्वाची माहिती


मुंबईत लसीकरणाविषयी एक महत्वाची बातमी देखील समोर आली आहे. ती म्हणजे 24 ते 26 मे या कालावधीत थेट केंद्रात पोहोचणाऱ्या लोकांना लसीकरण करण्यात येईल आणि ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या लोकांना 27 ते 30 मे या काळात लसीकरण सुरु केले जाईल. रविवारी लसीकरण बंद असेल.


देशातील 3 लाख 2 हजार 544 लोकं कोरोनामुक्त


जर देशातील कोरोनाच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे. त्याचबरोबर बरे झालेल्या लोकांची संख्या कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जास्त आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 2 हजार 544 लोक पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे एका दिवसात 4 हजार 454 लोकांनी जीव गमावला आहे.