Beed Police Superintendent Navneet Kanwat : बीड पोलीस दलात एकाच जातीच्या पोलिसांची भरती केली, असा आरोप केला जातोय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे जातीय वातावरण ढवळून निघाले. पोलीस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी आहेत आणि ते आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप होतो. त्यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलिसांच्या पहिल्या नावाचा वापर करण्याचे आदेश दिले. तसेच एकमेकांना हाक मारताना आडनावाचा वापर करू नये असंही या आदेशात म्हटलंय. बीडमधील जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश लागू करण्यात आलाय. या निर्णयाचं नागरिकांतून कौतुक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड पोलीस दलात विशिष्ट आडनावाचे पोलीस विशिष्ट जातीचे आहेत हे प्रतित होत. विशिष्ट जातीचे पोलीस हे वाल्मिकचे सहानुभूतीदार तर नाही ना अशी शंका घेतली जाऊ लागलीये. केवळ आडनावावरुन पोलिसांकडं संशयानं पाहिलं जाऊ लागल्यानं आता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एक वेगळाच निर्णय घेतलाय. बीडमधील प्रत्येक पोलिसाला त्याच्या नावानं हाक मारली जावी असा दंडक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घातलाय. कोणत्याही पोलिसाला त्याच्या आडनावानं हाक मारु नये असे आदेश कॉवत यांनी दिलेत.


बीडच्या राजकीय गुन्हेगारीकरणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून गाजतोय. वाल्मिक कराडनं गुन्हेगारी कारवायांसाठी राजकारणात आणि पोलीस दलात सहानुभूतीदारांची फौजच तयार केल्याचा आरोप होतोय. बीड पोलीस दलात वाल्मिक कराडच्या सहानुभूतीदारांची मोठी यादीच तृप्ती देसाईंनी टाकली होती. त्यावर सुरेश धस यांनी 26 नव्हे तर 226 पोलीस कर्मचारी वाल्मिकचे सहानुभूतीदार असल्याचा आरोप केला होता. भाजप आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात प्रशासनावर आरोप केलेत. प्रशासनातील बिंदू नामावलीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केलाय.


पोलीस विभागातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी झिरो टॉलरन्स पॉलिसी स्वीकारली आहे. त्यानुसार ऑन ड्युटी असताना रील्स काढल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. नवनीत कॉवत यांच्या या आदेशानं पोलिसांची जात लपली जाणार असली तरी वाल्मिक कराडचे जे सहानुभूतीदार आहेत त्यांचं काय असा प्रश्न खासगीत विचारला जातोय. वाल्मिक कराडच्या सहानुभूतीदार पोलिसांना शोधून त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवल्यावरच पोलिसांची कार्यपद्धती निपःक्ष होईल अशी अपेक्षा आहे. आडनाव लपवून काहीही साध्य होणार नाही असं बीडच्या जनतेला वाटतंय.