चांगली बातमी! महाराष्ट्रात `डेल्टा प्लस`चे दोन रूग्ण पूर्णपणे झाले बरे
कोरोनाच्या धोकादायक `डेल्टा प्लस` व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे.
मुंबई : कोरोनाच्या धोकादायक 'डेल्टा प्लस' व्हेरियंटने राज्यात शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रूग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. मात्र आता समाधानकारक बाब म्हणजे यापैकी 2 रूग्ण बरे झाले असल्याची माहिती मिळतेय.
यापैकी काही कोरोना प्रकरणं ही एप्रिलच्या सुरुवातीला सापडली होती. परंतु त्यांचे जीनोम सिक्वेंससाठी पाठवले गेले होते. ते गेल्या आठवड्यात आले.
मुंबईत डेल्टा-प्लस ही दोन प्रकरणं 5 एप्रिल आणि 15 एप्रिलच्या सुरुवातीला कोविड पॉझिटिव्ह होती. त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून हा व्हेरिएंट शहरात आहे. त्यापैकी एक ठाणे येथील रहिवासी असून त्यांच्यावर मुंबईत उपचार करण्यात आले होते, तर दुसरे एक 78 व्यक्ती आहेत. डेल्टा-प्लसमुळे ग्रस्त बहुतांश लोकांनी लस घेतली नसल्याचं समोर आलं आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वरिष्ठ नागरिक आता ठीक झाले असून सध्या त्यांना कोणतीही तक्रार नाहीये. या व्यक्तीच्या घरातील एक व्यक्तीही पॉझिटीव्ह आली होती, मात्र आता त्यांची प्रकृती देखील उत्तम आहे.
राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रूग्ण सापडल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. 15 मे पासून जवळजवळ 7 हजाराच्या वर सॅम्पल घेण्यात आले असून यांचं whole genome sequencing करण्यात आलं. ज्यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे 21 रूग्ण सापडले आहेत," असं राजेश टोपे यांनी सांगितलं होतं.
दरम्यान डेल्टा प्लस स्पाईक प्रोटीनच्या मदतीने पेशींवर आक्रमण करतो. आणि हा व्हायरस रोगप्रतिकारकशक्तीवर आक्रमक हल्ला करतो. त्यामुळे कोरोनावरची लस डेल्टावर परिणामकारक ठरण्याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत होती.