पुणे : दोन महिन्यांपूर्वी ढोबळी मिरची, टोमॅटोला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी रस्त्यावर ढोबळी मिरची, टोमॅटो फेकून दिल्याच्या घटना राज्यात ठिकठिकाणी घडल्या होत्या. अपेक्षित भाव नसल्याने अनेकांनी शेतीमालावर नांगर फिरवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काहींनी ढोबळी मिरचीची लागवड कमी केली. पण, दिवाळीत उपाहारगृहचालकांकडून ढोबळी मिरचीला मागणी वाढल्याने मातीमोल ढोबळीला पुन्हा भाव आला. किरकोळ बाजारात सध्या एक किलो ढोबळीला 120 ते 130 रुपये असा भाव मिळतो आहे.  


दोन महिन्यांपूर्वी एक किलो ढोबळी मिरचीला घाऊक बाजारात 5 ते 6  रुपये भाव मिळाला होता. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढलेला आहे. लागवडीचा खर्च न मिळाल्याने शेतकऱ्यांनी ढोबळी मिरचीसह टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला होता. लागवड खर्च मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवड कमी प्रमाणावर केली. दिवाळीत अनेकजण सहकुटुंब उपाहारगृहात जातात. उपाहारगृहचालक तसेच किरकोळ ग्राहकांकडून ढोबळीला मागणी वाढली.


दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात एक किलो ढोबळी मिरचीला प्रतवारीनुसार 15 ते 25 रुपये किलो असा भाव मिळाला होता. घाऊक बाजारात 10 किलो ढोबळी मिरचीच्या गोणीला 150 ते 200 रुपये असा भाव मिळाला होता. सध्या घाऊक बाजारात दहा किलो ढोबळी मिरचीच्या गोणीला एक हजार ते ११०० रुपये असा भाव मिळाला आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे.