योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राष्ट्रीय महामार्गांवर फास्टट्रॅग यंत्रणा नीटपणे कार्यान्वित होत नसल्याने महामार्गांवर आजही वाहनांच्या रांगा आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बाबतीत वाहनधारकांचा विचार करून अंमलबजावणी केली नसल्याने गोंधळात अधिक भर पडत आहे. त्यात या नवीन यंत्रणेला नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्याने वाद अधिकच चिघळला आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोल नाक्यांवर वाहनांचा खोळंबा होऊ नये यासाठी फास्टटॅग यंत्रणा आणण्यात आली. पण या फास्टटॅगमुळे सुविधा कमी आणि खोळंबा जास्त होत असल्याची स्थिती आहे. नाशिकचा विचार केल्यास नाशिक परिसरातल्या टोल नाक्यांवर अजूनही फास्टटॅग यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वयीत झालेली नाही. त्यामुळे टोल नाक्यांवर फास्टटॅगच्या रांगेतही वाहनांच्या रांगा दिसतात. फास्टटॅगपेक्षा आधीची टोलवसुली बरी होती असं म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे.


पिंपळगावच्या शेतकऱ्यांकडून स्थानिक म्हणून कमी टोल वसुल केला जायचा. मात्र फास्टटॅगमुळे आता पूर्ण टोल वसूल केला जातोय. शिवाय बँकेत पैसे ठेवण्याची सक्तीही शेतकऱ्यांना अडचणीची ठरतेय.


सरकारनं फास्टटॅगबाबत जे दावे केले ते दावे फोल ठरताना दिसतायेत. वाहनचालकांसाठी फास्टटॅगमधून जाणं म्हणजे विकतचा जाच वाटू लागलाय. वाहनचालकांचा संयम सुटण्याअगोदरच सरकारने फास्ट टॅगमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची मागणी होत आहे.