किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील सेनेच्या इच्छुक उमेदवारांनी मिसळ पार्टीच आयोजन केल्याने युतीत ठसका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकमधील याच ठसकेबाज राजकीय मिसळ पार्टीवरून भाजपची जागा घेण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिसळ आणि नाशिक हे समीकरण तसे नवीन नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये सुरु असलेल्या राजकीय मिसळ पार्ट्यांनी नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. भाजपाचा मतदार संघ असलेल्या नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचे इच्छुक उमेद्वार विलास शिंदे यांनी दावा सांगत मिसळ पार्ट्यांच्या माध्यमातून भाजपला आव्हान देत प्रचार सुरू केला आहे.


विशेष म्हणजे युती आणि जागा वाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसतांना शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी देखील इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांच्या मागणीला बळ दिले आहे.


नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांनी आयोजित केलेल्या या मिसळ पार्ट्यांना शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री, संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, पालिकेतील विरोधी पक्षनेते यांसह सर्वच पदाधिकारी अंतर्गत गटतट विसरून हजेरी लावत असल्याने या जागेहुन युतीत ठसका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.