जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शिवसेनेच्या संपर्कात असल्याची कबुली दिलीय. शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्याला संपर्क केला आणि आपणही शिवसेनेच्या संपर्कात होतो असं खडसेंनी स्पष्ट केलंय.  तसंच आपलं तिकीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच कापलं गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खडसेंनी उघडपणे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचं नाव घेतलंय. 


फडणवीस घेणार खडसेंची भेट?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते  देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा जळगावात येणार आहेत. 'जैन हिल्स'ला त्यांचा मुक्काम असेल. उद्या धुळे-नंदुरबार प्रचार दौऱ्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. एकनाथ खडसे यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची ही जळगाव भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. परंतु, खडसे-फडणवीस भेट होणार का? याबाबत मात्र अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.  


खडसेंच्या अगोदर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. इतकंच नाही तर जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला एकनाथ खडसेंची साथ मिळेल, असंही त्यांनी म्हटलं होतं. शनिवारी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सर्व सदस्यांची एकत्रित बंद दाराआड बैठक घेतली, त्यामुळे चर्चांना आणखीनच उधाण आलंय.


दुसरीकडे, एकनाथ खडसे कोणत्याही परिस्थितीत भाजप सोडून जाणार नाहीत, असा दावा माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. तसंच खडसेंनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत एकत्रितपणे बसून चर्चा करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.