आयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे, ७५ कोटींची बेहिशेबी मालमत्ता
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर टाकण्यात आलेल्या आयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे झालेत. या छापेमारीत एकूण ७५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे.
नाशिक : तीन जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांवर टाकण्यात आलेल्या आयकर छाप्यांमध्ये धक्कादायक खुलासे झालेत. या छापेमारीत एकूण ७५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. गेल्या तीन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि जळगावमध्ये आयकर विभागाकडून खासगी वैद्यकीय व्यवसायिकांवर छापेमारी मारण्यात आली. या तीन जिल्ह्यातील पंचवीस ते तीस वैद्यकीय व्यावसायिकांकडे एकाच वेळी व्यावसायिकाने रहिवासी मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यांमधून अकरा कोटी रुपयांची रोकड आणि दागिने सापडलेत. तर काही व्यावसायिकांकडे अजूनही चौकशी सुरू आहे.
जळगाव मधील प्रथितयश खासगी रुग्णालयांवर आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत अनेक संशयास्पद कागदपत्रे तसंच सोने खरेदी व्यवहारासह रोकडबाबत मोठी कारवाई झाल्याचं समजते. आयकर विभागाच्या औरंगाबाद, नाशिकच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाच वेळी जळगावात पाच ते सहा डॉक्टर्सकडे धाडी टाकल्या होत्या. प्रत्येक डॉक्टर्सला वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक उत्पन्न येत असल्यानं अनेक डॉक्टर्स कर चूकवेगिरी करीत असल्याच्या तक्रारी आयकर विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. शहरातील चिन्मय, नेत्रम, वर्धमान, मधुर, गोल्ड सिटी आदी हॉस्पिटलमध्ये आयकर विभागाने चौकशी केलीय. अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत आक्षेपार्ह कागदपत्रे तसंच सोने खरेदीचे व्यवहार तपासून यासंदर्भातले कागदपत्रे आयकर विभागाने सील केल्याची माहिती आहे. काही डॉक्टर्सकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची माहिती आयकर विभागाच्या हाती लागलीय.
नाशिक पाठोपाठ धुळे शहरातील नामांकित डॉक्टरांच्या घरी आणि रुग्णालयांमध्ये आयकर विभागाने छापे टाकले आहेत. याबाबत संबंधित डॉक्टर आणि आयकर विभाग कुठलाही अधिकृत माहिती अथवा दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र सकाळपासून शहरातील तीन नामांकित डॉक्टरांकडे हे छापासत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई आणि नाशिक येथील पथक धुळे शहरात या डॉक्टरांकडे तपासणी करीत आहे. धुळे जिल्हा पोलिसांकडून याबाबत माहिती घेतली असता पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त देण्यात आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही डॉक्टर शहरातील जुने प्रॅक्टिशनरस आहेत. तसेच त्या-त्या क्षेत्रातील ते म्हणून ओळखले जातात. रुग्णालय पप्रशासनाने याबाबत कुठलीही माहिती माध्यमांना देण्यात आलेली नाही.
औरंगाबादेत काल आयकर विभागाचे धाडसत्र सुरु आहे, मुंबईहून आणि अहमदनगरहून आयकर विभागाची टीम औरंगाबादेत आली आहे, त्यांच्याकडून ही कारवाई सुरु आहे, काही बिल्डर्स आणि मोठ्या व्यावसायिकांच्या घरावर आणि कार्यालयावर ही कारवाई सुरु आहे, तापडीया कन्सट्रक्शन, मनिष धूत , रवि खिवंसरा अशा यासह आणि काही व्यावसायिकांवर हे छापे टाकले आहे, या सगळ्यांच्या कार्यालयात आणि घरी झडतीसत्र सुरु आहे.