उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. या दिवसांमध्ये मूत्रमार्गाचे संक्रमण आणि मूतखड्याचे विकार होतात. पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, मळमळ आणि लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवी येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत जी मूतखड्यामुळे संबंधीत व्यक्तींमध्ये आढळतात. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने ही स्थिती टाळता येते. अशावेळी दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
 
मुतखडा हा लघवीमधून वेगळ्या होणाऱ्या कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम ऑक्झॅलेटसारख्या विशिष्ट क्षारांच्या स्फटीक कणांपासून बनलेले कडक पदार्थ असतात. या खड्यांचा आकार काही सेंटीमीटरपर्यंत वाढू शकतो. काही खडे कोणत्याही उपचाराशिवाय स्वतःहून विरघळतात तर मोठ्या खड्यांना मात्र शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.
 
पुण्याच्या एका रूग्णालयातील मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. पवन रहांगडाले म्हणाले की, उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे शरीर हायड्रेटेड राखण्यासाठी ठराविक अंतराने पाणी प्यावे. लघवीचा रंग स्वच्छ पाण्यासारखा आहे का हे तपासणे गरजेचे आहा. गडद पिवळसर रंगाची लघवी ही निर्जलीकरणाचा संकेत देते. सतत घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यासाठी पुरेसे हायड्रेशनची गरज भासते. मूत्रमार्गातील खड्यांच्या लक्षणांमध्ये पाठ किंवा ओटीपोटात वेदना होणे, मळमळणे आणि लघवीमध्ये रक्त आढळून येणे अशी असतात. वेळीच उपचार न केल्यास, मूत्रमार्गातील खड्यांमुळे मूत्रपिंडाचा संसर्ग किंवा किडनी खराब होऊ शकते.
 
डॉ रहांगडाले पुढे म्हणाले की, पालक, रताळे, बीट आणि बदाम यांसारख्या ऑक्सलेट-समृद्ध पदार्थांच्या सेवनाने मूतखड्याची शक्यता कमी होते. दिवसभर भरपूर पाणी पिऊन हायड्रेट राहणे हा मूतखड्याची समस्या दूर ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. जीवनशैलीतील बदलांव्यतिरिक्त, दगडाचा आकार आणि स्थान यानुसार विविध उपचार पर्याय उपलब्ध आहेत. तज्ज्ञांकडून एक्स्ट्राकॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी (ईएसडब्ल्यूएल) चा सल्ला दिला जाईल ज्यामध्ये मोठ्या दगडांचे लहान तुकडे करण्यासाठी आणि त्यांना कोणत्याही त्रासाशिवाय बाहेर काढण्यासाठी ध्वनी लहरींचा समावेश आहे. दुसरा पर्याय म्हणजे युरेट्रोसॅकोपी आणि लेझर ज्यामध्ये मूत्रमार्गातील लहान खडे तपासण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी लहानशा यंत्राचा वापर केला जातो. मोठ्या खड्यांच्या बाबतीत शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जाईल. 


पुण्यातील युरोलॉजिस्ट डॉ रविंदर होडारकर म्हणाले की, "उन्हाळ्यात उष्णतेमुळे मूत्रमार्गात खडे होण्याचे प्रमाण वाढते. गेल्या दोन महिन्यांत मूत्रमार्गात खडे झाल्याची तक्रार घेऊन 20 हून अधिक रुग्ण उपचारासाठी आले होते. कोरडे हवामान ज्यामुळे निर्जलीकरण होते कारण लोक पुरेसे पाणी पित नाही. शिवाय, उच्च तापमान आणि जास्त घाम येणे शरीरातील द्रवपदार्थ कमी करण्यास प्रवृत्त करते. ज्यामुळे लघवीत खडे तयार होतात. यामुळे पोटात असह्य वेदना होऊ लागतात. यामुळे लघवी करताना वेदना आणि ओटीपोटात अस्वस्थता ही सामान्य लक्षणे दिसून येतात. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करा आणि लघवीतील खडे टाळण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी पिऊन हायड्रेट राहा.