इंदापूर : इंदापूर बाजार समितीच्या वतीनं शरद कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्त महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ्या कुतुहलानं उखाणा स्पर्धेबद्दल विचारणा केली. त्यावर या स्पर्धा संध्याकाळच्या सत्रात घेणार असल्याचं निवेदिकेनं सांगितलं. मात्र शरद पवार यांनी मला वाटलं आमच्यासमोरच कोणीतरी उखाणा घेईल, असं म्हणत या निवेदिकेलाच उखाणा घ्यायला सांगितला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यावर या निवेदिकेनं लांबलचक उखाणा घ्यायला सुरुवात केली. पण पटकन नाव घ्या हो, असं म्हणत पवारांनी या निवेदिकेला उखाणा पूर्णही करायला लावला. त्यानंतर शरद पवार यांनी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांना उखाणा घेताय का? अशी विचारणा केली. या नेत्यांन उत्साहात उखाणाही घेतला. त्यानंतर मात्र पवारांनी उखाणा कसा सोप्या आणि सरळ भाषेत असावा असं म्हणत 'नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात' असं हातवारे करत उखाणा घेतला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.


याच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळ्या वाजत शरद पवार यांच्या उखाण्याला दाद तर दिलीच. मात्र माईकजवळ येत आता संध्याकाळी बाबांना घरी आईकडून नो एंट्री होईल, हे रेकॉर्ड करु नका नाहीतर बाबांना घराबाहेरच झोपावं लागेल असं म्हणत, उपस्थितांमध्ये हास्य फुलवलं.