चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : मुंबई एक्स्प्रेस हायवेवर (mumbai pune expressway) भरधाव वेगात गाडी चालवणे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) चांगलेच महागात पडलं आहे. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी दोन वेळेस नियमांचा भंग करत भरधाव वेगात कार चालवल्याचे समोर आलं आहे. पुण्यात भारत विरुद्ध बांगलादेश (Ind vs BAN) क्रिकेट सामना असल्याने रोहित शर्मा मुंबईहुन पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी रोहित शर्माने भरधाव वेगाने गाडी चालवली. त्यावेळी भरधाव वेगात असलेली कार सीसीटीव्हीत कैद झाली. त्यामुळे रोहित शर्माला आता चार हजारांचा दंड भरावा लागला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रोहितच्या कारवर दंड असल्याचं 12 ते 24 तासांनी महामार्ग पोलिसांना समजलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गहुंजे स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मंगळवारी दुपारी मुंबईहून पुण्याला जात असताना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला दोन वेळा ओव्हरस्पीडिंग केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. महामार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रोहितच्या लॅम्बोर्गिनीने उरुसने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 105 किमी प्रतितास ही परवानगी असलेली वेग मर्यादा दोनदा ओलांडली. महामार्ग पोलिसांनी प्रत्येक उल्लंघनासाठी त्याला 4000 रुपये दंड ठोठावला.


वाहनांचा वेग तपासण्यासाठी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेच्या दोन्ही लेनवर ऑटोमॅच कॅमेरे बसवण्यात आले आहेत. कोणत्याही वाहनाने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचे कॅमेर्‍याद्वारे रेकॉर्ड केले असल्यास, त्याच्या मालकावर दंडाच्या रकमेसह वाहतूक चलन प्रणालीद्वारे जारी केले जाते. त्यानुसार रोहित शर्माला चार हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.


या कॅमेराने रेकॉर्ड केलेल्या फुटेजनुसार रोहित शर्मा याच्या कारने कामशेत बोगद्याजवळ दुपारी 2.54 वाजता पहिल्यांदा वेग मर्यादा ओलांडली. कामशेत बोगद्याजवळ वेग मर्यादा 105 किलोमीटर प्रतितास (किमी) आहे. पण इथे रोहित शर्माच्या गाडीचा वेग येथे 117 किमी प्रति तास होता. काही वेळाने सोमाटणे फाट्याजवळ पुन्हा वेगमर्यादा ओलांडून 111 किमी प्रतितास इतकी झाली होती.


माध्यमांच्या वृत्तानुसार, रोहित त्याच्या भारतीय संघाच्या सहकाऱ्यांसह सामन्याआधी पुण्यात पोहोचला होता. मात्र सोमवारी तो मुंबईत त्याच्या कुटुंबाकडे परतला होता. त्यानंतर तो मंगळवारी पुन्हा पुण्याकडे निघाला होता. दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्र राज्यातील दोन प्रमुख शहरांमधील 6-लेन महामार्ग आहे. हे अंदाजे अंतर 94 किलोमीटरचे आहे. 2002 मध्ये सार्वजनिक वापरासाठी सुरु करण्यात आला होता.