योगेश खरे, झी मीडिया नाशिक : नाशिक जिल्ह्यातील आदिवासी आता परदेशात आंबा निर्यात करू लागले आहेत. चक्क यू ट्यूबच्या मदतीने थायलँड आणि नेदरलँड या देशातून ही मागणी नोंदवण्यात आलीय. आंब्याची निर्यात करणारे कोकणातले व्यापारीही हे अभिनव तंत्रज्ञान पाहण्यासाठी नाशिकच्या रानावनात येत आहे. सुंदराबाई आणि दामोदर वाघेरे दोघेही गुजरात सीमेजवळच्या हर्सूल परिसरात राहतात. या दाम्पत्याने पाच हजार केशर आंब्याची झाडं लावली. झाडं लावताना त्यांनी जंगली आंबा आणि केशर आंबा यांचं कलम तयार केलं. 


नदीतून पाण्याचं ठिबक सिंचन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 बाय 14 फुटांवर एकरी हजार झाडांची लागवड केली. नदीतून पाण्याचं ठिबक सिंचन केलं. त्यांचा मुलगा जनार्दन कृषी पदविकाधारक आहे. त्याने मोबाईलचा स्मार्ट वापर करून इस्त्रायल आणि जर्मन कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. सतत तीन वर्षे प्रयोग करून त्याला यश मिळालं. 


दोन वर्षाच्या झाडांना आंबे


गेल्या दोन वर्षांपासून बागेतल्या झाडांना फळ येण्यास सुरूवात झाली. गेल्यावर्षी सेंद्रीय पद्धतीने त्यांनी सहाटन आंबा पिकवला. वर्तमानपत्राचा कागद वापरून पंधरा दिवसांत आंबा पिकवण्याचं तंत्र त्यांनी आत्मसात केलं. विलास भोये हे शेतकरीही एक्स्पोर्ट क्वालिटी आंबा पिकवत आहेत. त्यांनाही राज्य सरकारचं आंबा एक्स्पोर्ट प्रमाणपत्र मिळालंय.


नापीक शेतीत हा प्रयोग कौतुकास्पद


सह्याद्रीच्या दुर्गम भागात राहणाऱ्या या आदिवासी शेतकरी कुटुंबाने आकाशाला गवसणी घालणारं यश मिळवलंय. हा प्रयोग बघण्यासाठी संपूर्ण राज्यातून शेतकरी येतायत. नापीक शेतीत भाव देणारा हा प्रयोग कौतुकास पात्र ठरला आहे.