मुंबई : राज्यातील शाळा वाढत्या कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरु न करता दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी चर्चा महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली. ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याबाबतचा आढावा घेण्यासंदर्भातील निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शालेय शिक्षण विभागाला दिले. त्यामुळे तुर्तास शाळा या दिवाळीनंतर सुरु करण्याचे संकेत देण्यात आले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात  १५ ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकारला त्यांच्या राज्याची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबबात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. त्यामुळे राज्यशासनाकडून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय  जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरु होण्याबाबत विचार होऊ शकतो, तसे संकेत मिळत आहेत. ९ ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु करण्याबाबत विचार सुरु आहे.


शाळा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. विविध राज्यांच्या शालेय शिक्षणमंत्र्यांना त्याची अंमलबजावणी करायची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असल्याचंही केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पालकांची संमती असेल तर विद्यार्थी शाळेत येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शाळांनाही विश्वासात घेण्याची सूचना देण्यात आली आहे. सुरक्षा आणि शिक्षण हे दोन्ही गरजेचं असून याचा समतोल राखत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा, असे केंद्राकडून करण्यात आले आहे.