Indurikar Maharaj On Gautami Patil : आक्षेपार्ह डान्स स्टेपमुळे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil)  नेमहीच चर्चेत असते. गौतमीचे अनेक चाहते असले तरी तिचे तितकेच विरोधक देखील आहेत. गौतमीला विरोध करणाऱ्या विरोधकांच्या यादीत आता प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj ) नाव देखील सामील झाले आहे. गौतमी पाटील इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर आली आहे. इंदुरीकर महाराज यांनी आपल्या खास शैलीत गौतमी पाटीलचा समाचार घेतला आहे. 


नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन गाणे वाजवून तिला तीन लाख आणि आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला म्हणून आरोप... अशा शब्दात प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटीलचं नाव न घेता समाचार घेतला. गाण्यांच्या कार्यक्रमात हाणामारी होते, काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षण देखील दिलं जात नाही असं म्हणत इंदुरीकरांनी गौतमीवर टीकेची तोफ डागली. 


नृत्यांगना गौतमी पाटील सध्या राज्यभरात चर्चेत आहे. गौतमी पाटीलचा अनेकांनी विरोध देखील केला. आता यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचीही भर पडलीये. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे आज इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी गौतमी पाटील हिचा समाचार घेतला आहे. 


वादग्रस्त किर्तामुळे इंदुरीकर महाराज नेहमी चर्चेत असतात. इंदुरीकर महाराज आपल्या खास विनोदी शैलीत कीर्तनातुन समाजप्रबोधन करतात. मात्र, इंदुरीकरांच्या कार्यक्रमात चिमुकल्यानं गौतमीच्या गाण्यावरच ठेका धरला होता. गौतमी पाटीलच्या अदाकारीनं तरूणाईसह चिमुकली पोरंही बिथरली आहेत. याचा प्रत्यय किर्तनकार इंदुरीकर महाराजांनीही आला. इंदुरीकरांच्या कार्यक्रमात एका चिमुकल्यानं चक्क स्टेजवर येऊन गाण्यावरच ठेका धरला. त्याचा हा थाट पाहून इंदुरीकरांवरच हात जोडण्याची वेळ आली होती.  सोशल मीडियात याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. 


नगरमधल्या कोपरगावात पुन्हा गौतमीच्या कार्यक्रमात राडा


नगरमधल्या कोपरगावात पुन्हा गौतमीच्या कार्यक्रमात राडा झालाय. कोपरगावच्या कोळपेवाडीत महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मंचासमोर एका तरुणाने गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न केला. तर, अनेक तरुण सेल्फीसाठी स्टेजजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रचंड गर्दी आणि गोंधळ झालाच. शेवटी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. प्रत्येकवेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलीस प्रशासनाची मोठी दमछाक होताना बघायला मिळते.