जितेंद्र शिंगाडे, झी २४ तास, नागपूर : क्राईम कॅपिटल बनत चाललेल्या नागपुरात तडीपार (हद्दपार) गुंडाच्या मुसक्या आवळण्यासाठी नागपूर पोलिसांनी एक विशेष मोहीम आखली आहे. चौक-चौकात जाहीर फलकांवर या तडीपार गुन्हेगारांच्या फोटोसह त्यांची माहिती देण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादा, काका, मामा, भाई अशी नावे देऊन कुणाच्या वाढदिवसाचे तर कुणाला शुभेच्छा देण्याचे चौका-चौकात होर्डिंग लावून कुख्यात गुंड आपली दहशत पसरविण्याचा अनेकदा प्रयत्न करतात. मात्र आता अशाच गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्याची अनोखी मोहीम नागपूर पोलिसांनी हाती घेतली आहे. विविध गंभीर गुन्ह्यांच्या आरोपावरून ज्या गुन्हेगारांना नागपूर शहरातून तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे, त्या गुन्हेगारांचे मोठे फलक शहरातील मुख्य चौकात लावण्यास नागपूर पोलिसांनी सुरवात केली आहे. ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत जे तडीपार गुन्हेगार असतील त्यांच्या फोटोसह माहिती, पत्ता, हद्दपारीचे ठिकाण व हद्दपारीचा कालावधी ही माहिती या फलकांवर देण्यात आली आहे. हद्दपारीच्या कालावधीत जर हा गुन्हेगार त्या परिसरात दिसला तर फलकांवर दिलेल्या पोलिसांच्या फोन क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन नागपूर पोलिसांनी केले आहे. 


हद्दपारीचा आदेश असूनही अनेक गुन्हेगार हे शहरात मोकाट फिरत असतात. रात्रीच्या वेळी अनेक गंभीर गुन्हे हे गुन्हेगार घडवीत असतात. खंडणी, मारहाण, धमकी, खून किंवा खुनाचा प्रयत्न अशा अनेक घटनांमध्ये यापूर्वी तडीपार गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यावेळी थेट अशा हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची संपूर्ण कुंडलीच पोलिसांनी जनतेसमोर ठेवली आहे. हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची माहिती प्रसार माध्यमात देण्याची पद्धत यापूर्वीही अस्तित्वात आहे. परंतु पहिल्यांदाच नागपूर पोलिसांनी या गुन्हेगारांची माहिती जाहीर फलकांद्वारे देण्याची मोहीम हाती घेतली आहे. सध्या मानकापूर पोलीस स्टेशनमधून या मोहिमेस सुरवात झाली असून काही दिवसात संपूर्ण नागपूर शहरात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी दिली.


नागपूर शहरात आजच्या घडीला सहाशे ते सातशे गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे पन्नास गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचे जाहीर फलक संबंधित पोलीस स्टेशन हद्दीत लावण्याचे कार्य सुरु आहे. ज्या फलकांचा व होर्डिंगचा वापर करून गुन्हेगार नागरिकांत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतात. आता याच माध्यमाचा वापर करून नागरिकांमधील गुन्हेगाराची दहशत कमी करण्याचा पोलिसांचा हा प्रयत्न आहे. शिवाय तडीपार गुन्हेगाराची माहिती पोलिसांना मिळवणे यामाध्यमातून शक्य होईल असा विश्वास पोलिसांना आहे. गुन्हेगारांना वेसण घालण्याची नागपूर पोलिसांची ही योजना नक्कीच स्वागतयोग्य आहे. परंतु ही योजना किती प्रभावी ठरते हे येत्या काळातच स्पष्ट होईल.